मुंबई उपनगर, परभणी उपांत्य फेरीत दाखल

राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

Mumbai

मुंबई उपनगर, परभणी यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या ३१व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. त्यांच्या बरोबर पुणे, ठाणे यांनी किशोर, तर रायगड कोल्हापूर यांनी किशोरी गटात उपांत्य फेरी गाठली. मुंबई उपनगर विरुद्ध पुणे, परभणी विरुद्ध ठाणे अशा किशोर, तर मुंबई उपनगर विरुद्ध रायगड, कोल्हापूर विरुद्ध परभणी अशा किशोरी गटात उपांत्य लढती होतील.

अहमदनगर येथील रेसिडेंसियल हायस्कुलच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या किशोर गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान अहमदनगरला आज पराभवाचा धक्का बसला. पुणे संघाने नगरचा २६-१९ असा पाडाव करीत प्रथम उपांत्य फेरी गाठली. दुसर्‍या सामन्यात मुंबई उपनगरने गतविजेत्या कोल्हापूरला ३८-३७ असे चकवीत उपांत्य फेरी गाठली. किशोर गटात विजय मिळविताना उपनगरला कष्ट घ्यावे लागले. पण किशोरी गटात मात्र मुंबई उपनगरने सांगलीला ६१-१७असे बुकलून काढत उपांत्य फेरी गाठली. परभणीने बलाढ्य पुण्याचा ४५-२८ असा सहज पाडाव करीत किशोरी गटात उपांत्य फेरीत धडक दिली. पहिल्या डावात एक लोण देत १८-१४अशी आघाडी घेणार्‍या परभणीने दुसर्‍या डावात देखील दोन लोण देत पुण्याच्या गोटातील हवाच काढून घेतली. रायगडची मुले पराभूत झाली असली तरी किशोरी गटात रायगडने आपले आव्हान जिवंत ठेवले. रायगडने अटीतटीच्या लढतीत ठाण्याचा प्रतिकार ४२-३९ असा मोडून काढला.

ठाण्याच्या मुलांनी मात्र रत्नागिरीला ४०-१७ असे पराभूत करीत आपले आव्हान जिवंत ठेवले. कोल्हापूरची मुलांचे आव्हान संपुष्टात आले असले तरी कोल्हापूरच्या मुलींनी सिंधुदुर्गला ४३-३१ असे पराभूत करीत आपल्या आशा कायम राखल्या.