राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा

Mumbai
देना बँकेच्या महिलांची जेतेपदाची हॅट्ट्रिक

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या महिला खुल्या गटात देना बँकेने जेतेपदाची हॅट्ट्रिक मारली. पुरुष ग्रामीण विभागात गतविजेत्या जे.एस.डब्ल्यू डोलवी संघानेही आपले वर्चस्व कायम राखले. शहरी पुरुष गटात मुंबई पोर्ट ट्रस्टने गतविजेत्या देना बँकेला अवघ्या एका गुणाने पराभूत करत ही स्पर्धा जिंकली.

महिला खुल्या गटात देना बँक आणि पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या संघात अंतिम लढत झाली. पहिल्या डावात पूजा यादव, ऋतुजा बांदवडेकर यांच्या आक्रमक चढाया आणि त्याला प्रियांका कदम, पौर्णिमा जेधे यांच्या चांगल्या पकडीची साथ यामुळे देना बँकेने १७-११ अशी ६ गुणांची आघाडी घेतली. दुसर्‍या डावात ठाणे महापालिकेच्या चढाईपटू कोमल देवकर, सायली नागवेकर यांनी चांगल्या चढाया करून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण देना बँकेने आपली आघाडी कायम ठेवत संयमी खेळ दाखवला आणि ३२-२२ असा हा सामना जिंकला.

पुरुष ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू डोलवी, रायगड आणि कुंभी कासारी कुडित्रे, कोल्हापूर या संघांमध्ये गतवर्षाप्रमाणे यंदाही अंतिम सामना झाला. यात जे.एस.डब्ल्यूने ३६-२८ अशी बाजी मारली. पहिल्या डावात जे.एस.डब्ल्यूला १२-११ अशी एका गुणाची आघाडी मिळाली. राजेंद्र देशमुख, राहुल कोळी यांनी चढाईत, तर सिद्धार्थ पाटील आणि सुचित पाटील यांनी पकडीत चमकदार कामगिरी केली.

पुरुष शहरी विभागात मुंबई पोर्टने देना बँकेला ४२-४१ अशा अवघ्या एका गुणाच्या फरकाने धूळ चारली. मुंबई पोर्टकडून स्मित पाटील, शुभम कुंभार, सुशांत मांडवकर यांनी उत्कृष्ट चढाया केल्या, तर मनोज बांद्रे आणि चेतन पारधी यांनी चांगल्या पकडी केल्या.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

पुरुष (शहर)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू – स्मित पाटील, मुंबई पोर्ट ट्रस्ट
सर्वोत्कृष्ट चढाई – नितीन देशमुख, देना बँक
सर्वोत्तम पकड – अमित जाधव, महावितरण

पुरुष (ग्रामीण)

सर्वोत्कृष्ट अष्टपैलू – राजेंद्र देशमुख, जे.एस.डब्ल्यू, डोलवी
सर्वोत्कृष्ट चढाई – राहुल कोळी, जे.एस.डब्ल्यू, डोलवी
सर्वोत्तम पकड – सतिश पाटील, कुंभी कासारी, कुडित्रे

महिला

सर्वोत्कृष्ट अष्टपैलू – पूजा यादव, देना बँक
सर्वोत्कृष्ट चढाई – सायली नागवेकर, ठाणे मनपा
सर्वोत्तम पकड – ज्योती ढफळे, शिवशक्ती

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here