घरक्रीडाब्रॉडची कमाल, इंग्लंडची धमाल!

ब्रॉडची कमाल, इंग्लंडची धमाल!

Subscribe

इंग्लंडने विंडीजचा २-१ असा पराभव करुन कसोटी मालिकेत सरशी साधली आणि विस्डेन ट्रॉफी पटकावली. जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या इंग्लंडने ०-१ अशा पिछाडीवरून मालिका फिरवली, त्याचे श्रेय वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला द्यावे लागेल. ब्रॉडला पहिल्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आले. याचा त्याला राग होताच, पण ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत संधी मिळताच त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले. दोन सामन्यांत मिळून १६ मोहरे टिपताना त्याने कसोटीत ५०० बळींचा टप्पा पार केला. तसेच तिसर्‍या आणि निर्णायक कसोटीत मोक्याच्या क्षणी ६२ धावांची खेळीही केली.

स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन ही इंग्लंडची जोडगोळी क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी तेज जोडगोळी! या तेज दुकलीने आतापर्यंत १०९० विकेट्स काढल्या आहेत. इंग्लंडला तेज गोलंदाजांची मोठी परंपरा असून काही तेज जोडगोळ्या गाजल्या आहेत. फ्रेड ट्रूमन-ब्रायन स्टेथॅम, बॉब विलिस-इयन बोथम यांनी आपली छाप पाडली होती. ऑस्ट्रेलियाकडे लिली-थॉमसन, पाकिस्तानकडे वसिम अक्रम-वकार युनूस, दक्षिण आफ्रिकेकडे अ‍ॅलन डोनाल्ड-शॉन पोलॉक अशा तेजतर्रार जोडगोळ्या होत्या. मात्र, सध्याचा टी-२० क्रिकेटच्या जमान्यात इंग्लंडने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी वेगवेगळे संघ निवडण्याचे धोरण आखले असून त्यानुसार ब्रॉड-अँडरसन जोडगोळीला केवळ कसोटीच खेळवण्यात येते. याचा फायदा इंग्लंडला होताना दिसत आहे. गेल्या वर्षी मायदेशी इंग्लंडने वर्ल्डकप पटकावला, तर आता कसोटीत विंडीजला नमवून विस्डेन ट्रॉफी हस्तगत केली.

ब्रॉडचे कौतुक अशासाठी की युवराजने २००७ टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यात ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारले होते. मात्र, ब्रॉडने जिद्द सोडली नाही. तो निर्धारपूर्वक खेळत राहिला आणि आता तर जगातील सर्वाधिक कसोटी विकेट्स काढणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तो सातवा स्थानावर पोहोचला असून मॅकग्रा, अँडरसन, वॉल्श या महान वेगवान गोलंदाजांच्या पंक्तीत सामील झाला आहे. योगायोगाची बाब म्हणजे अँडरसनप्रमाणेच ब्रॉडचाही ५०० वा बळी ठरला, विंडीजचा क्रेग ब्रेथवेट!

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी आहे. मात्र, स्टुअर्ट ब्रॉडचा पराक्रम पाहण्यासाठी त्याचे वडील ख्रिस ब्रॉड ओल्ड ट्रॅफर्डवर हजर होते आणि सामनाधिकार्‍याची (मॅच रेफ्री) भूमिका बजावत होते. आपल्या मुलाला ५०० बळी मिळवताना पाहून ख्रिस ब्रॉड यांना नक्कीच आनंद झाला असणार! स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीला गेल्या दोन वर्षात विलक्षण धार आली असून त्याने या काळात २२.६७ च्या सरासरीने १०१ विकेट्स काढल्या आहेत. कसोटीत ५०० बळींचा टप्पा पार करताना त्याची गोलंदाजी सरासरी पहिल्यांदाच २८ च्या खाली आली!

ब्रॉडप्रमाणे विस्डेन ट्रॉफीत यंदा ठसा उमटवला तो बेन स्टोक्सने. पहिल्या कसोटीत रूटच्या गैरहजेरीत स्टोक्सने इंग्लंडचे पहिल्यांदा नेतृत्व केले, पण चुकीच्या निवडीचा फटका त्याला, तसेच इंग्लंडला बसला. ब्रॉडला वगळणे इंग्लंडला महागात पडले. विंडीजने पहिली कसोटी जिंकून इंग्लंडला धक्का दिला. स्टोक्सने ६ मोहरे टिपले आणि थोड्याफार धावाही केल्या, पण त्या इंग्लंडचा पराभव टाळू शकल्या नाहीत. मात्र, ओल्ड ट्रॅफर्डच्या पुढच्या कसोटीत स्टोक्सने अष्टपैलू खेळाची छाप पाडताना १७६ आणि नाबाद ७८ धावा फटकावल्या. अलीकडे कसोटीमध्ये प्रदीर्घ डाव खेळण्याची परंपरा लुप्त होत चालली आहे. त्यामुळे स्टोक्सची कामगिरी लक्षवेधक ठरते. ओल्ड ट्रॅफर्डवर स्विंग गोलंदाजीचा मुकाबला करत त्याने ६ तास किल्ला लढवत २८५ चेंडूत कसोटीतील आपले दहावे शतक साजरे केले. मात्र, पुढची अर्धशतकी मजल त्याने ४६ चेंडूतच मारली.

- Advertisement -

विंडीजला दगा दिला तो फलंदाजांनी. सलामीची जोडी जमलीच नाही. ब्रेथवेट, ब्लॅकवूड, ब्रुक्सचा अपवाद वगळता इतर फलंदाज केवळ हजेरी लावून परतले. गोलंदाजीत किमार रोचने जीव तोडून मारा केला, पण पहिल्या कसोटीत नशिबाची साथ त्याला लाभली नाही. ओल्ड ट्रॅफर्डवर त्याने सुरेख गोलंदाजी करत कसोटी बळीचे द्विशतक साजरे केले. अशी कामगिरी करणारा तो विंडीजचा केवळ नववा गोलंदाज! ही मालिका कोणी जिंकली यापेक्षा चार महिन्यानंतर क्रिकेट पुन्हा सुरू झाले याचा आनंद आहे. येत्या बुधवारपासून इंग्लंड-पाक मालिकेला सुरुवात होणार असून अँडरसन ६०० बळींचा टप्पा पार करतो का?, तसेच रूटचा संघ लागोपाठ दूसरी मालिका जिंकतो का?, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -