घरक्रीडासुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक!

सुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक!

Subscribe

एलिट गटात पुन्हा इथिओपियाचा दबदबा

भारताची ऑलिंपियन धावपटू सुधा सिंगने रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनच्या १७ व्या पर्वात जेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. भारतीय गटात महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये अव्वल क्रमांक पटकावण्याची सुधाची सलग तिसरी (२०१८, २०१९, २०२०) आणि एकूण चौथी वेळ होती. भारतीय गटात पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये श्रीनु बुगथाने बाजी मारली. तसेच एलिट अ‍ॅथलिट्सच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये यंदाही इथिओपियाच्या धावपटूंचा पाहायला मिळाला. पुरुष एलिट गटामध्ये इथिओपियाच्या डेरारा हुरिसाने नवा विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर महिला एलिट गटात इथिओपियाचीच अमाने बेरीसो विजेती ठरली.

एशियाड पदकविजेत्या सुधा सिंगने मागील वर्षी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यामुळे यंदाही तिच्याकडून जेतेपदाची अपेक्षा केली जात होती आणि तिने या अपेक्षा पूर्ण करण्यात कोणतीही चूक केली नाही. तिने ४२ किलोमीटरचे अंतर २ तास ४५.३० मिनिटांत पूर्ण करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. तिच्यात आणि महाराष्ट्राच्या ज्योती गवतेमध्ये चांगली झुंज पाहायला मिळाली. या दोघींनीही २० किलोमीटरचे अंतर १ तास आणि १७.३७ मिनिटांत पूर्ण केले होते. मात्र, पुढील २२ किलोमीटरमध्ये सुधाने आपला वेग वाढवला. त्यामुळे याआधी ही स्पर्धा तब्बल सहावेळा जिंकणार्‍या ज्योतीला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. ज्योतीने २ तास ४९.१४ मिनिटे अशी वेळ नोंदवत रौप्य, तर पश्चिम बंगालच्या श्यामली सिंगने २ तास ५८.४४ मिनिटे अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले.

- Advertisement -

पुरुषांत श्रीनु बुगथा अव्वल

भारतीय गटात पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये श्रीनु बुगथाने बाजी मारली. त्याची मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्याची पहिलीच वेळ होती आणि पदार्पणातच ४२ किलोमीटरचे अंतर २ तास १८.४४ मिनिटांत पूर्ण करत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. शेर सिंग (२ तास २४.०० मिनिटे) आणि दुर्गा बहादूर बुधा (२ तास २४.०३ मिनिटे) या आर्मीच्या धावपटूंनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.

इथिओपियन धावपटूंची विक्रमी कामगिरी

इथिओपियाच्या डेरारा हुरिसाने पुरुष एलिट गटामध्ये २ तास ०८.०९ मिनिटे अशा विक्रमी वेळेसह अव्वल क्रमांक पटकावला. याआधी मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुषांत सर्वात जलद ४२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करणायचा विक्रम केनियाच्या गिदोन किपकेटरच्या नावे होता. त्याने २०१६ मध्ये २ तास ०८.३५ मिनिटे अशी वेळ नोंदवली होती. यंदा मात्र हुरिसासह इथिओपियाच्याच अन्य दोन धावपटूंनी यापेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण केली. आयेले अबशेरोने २ तास ०८.२० मिनिटे अशा वेळेसह रौप्य, तर बिर्हानु तेशोमेने २ तास २७.१४ मिनिटे अशा वेळेसह कांस्यपदक पटकावले. महिला एलिट गटात इथिओपियाची अमाने बेरीसो विजेती ठरली. तिने ४२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी २ तास २४.५१ मिनिटांचा वेळ घेतला. तिची सहकारी हेवन हैलूने २ तास २८.५६ मिनिटे अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. केनियाच्या रोदाह जेपकोरीरने रौप्यपदक मिळवले.

- Advertisement -

५५ हजारांहूनही अधिक धावपटूंचा सहभाग!

मुंबई मॅरेथॉनला दरवर्षीप्रमाणे यंदाही धावपटूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये (सर्व प्रकारच्या मिळून) देश-विदेशातून ५५,३२२ हजार धावपटू सहभागी झाले होते. मागील वर्षी ४६, ४१४ धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास १९ टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच यंदाच्या मॅरेथॉनमध्ये महिलांच्या संख्येतही वाढ झाली. या स्पर्धेत एकूण १५,८९० महिलांनी आपला सहभाग नोंदवला.

हॅटट्रिकचा झाल्याचा आनंद – सुधा

मी हॅटट्रिक करण्याचे लक्ष्य घेऊनच यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये उतरले होते. यंदा स्पर्धेचा मार्ग थोडा बदलला होता, पण त्याने फारसा फरक पडला नाही. मागील वर्षी उष्ण हवामान असतानाही मी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली होती. यंदा थंड हवा होती आणि याचा थोडा फायदा झाला, असे भारतीय गटात महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये विजेती ठरलेली धावपटू सुधा सिंग म्हणाली.

श्रीनु भविष्यात याहूनही दर्जेदार कामगिरी करेल – प्रशिक्षक रामू

भारतीय गटात पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये श्रीनु बुगथाने अव्वल क्रमांक मिळवला. तो आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूट, पुणेमध्ये केसी रामू यांच्या मार्गदर्शनात सराव करतो. श्रीनुने मुंबई मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक पटकावल्याचा प्रशिक्षकांना आनंद होता. तसेच तो भविष्यात याहूनही दर्जेदार कामगिरी करेल, असे रामू यांनी नमूद केले. श्रीनुसाठी आम्ही २ तास १७ मिनिटांचे लक्ष्य ठेवले होते, पण त्याने एक मिनिट जास्त घेतला. यंदा स्पर्धेचा मार्ग थोडा बदलला होता, हे त्यामागे एक कारण होते. ४० किलोमीटरनंतर त्याचा वेग थोडा कमी झाला. मात्र, ही केवळ त्याची दुसरी मॅरेथॉन आहे आणि त्याने ती जिंकल्याचा आनंद आहे. तो भविष्यात याहूनही दर्जेदार कामगिरी करेल याची मला खात्री आहे, असे प्रशिक्षक रामू म्हणाले. तसेच श्रीनु सुरुवातीला क्रॉसकंट्रीमध्ये धावायचा, पण आम्ही त्याला हळूहळू मॅरेथॉनसाठी तयार केले, असेही रामू यांनी सांगितले.

मॅरेथॉनचे निकाल –

एलिट पुरुष
१. डेरारा हुरिसा (२ तास ०८.०९ मिनिटे) (इथिओपिया)
२. आयेले अबशेरो (२ तास ०८.२० मिनिटे) (इथिओपिया)
३. बिर्हानु तेशोमे (२ तास ०८.२६ मिनिटे) (इथिओपिया)

एलिट महिला
१. अमाने बेरीसो (२ तास २४.५१ मिनिटे) (इथिओपिया)
२. रोदाह जेपकोरीर (२ तास २७.१४ मिनिटे) (केनिया)
३. हेवन हैलू (२ तास २८.५६ मिनिटे) (इथिओपिया)

भारतीय पुरुष
१. श्रीनु बुगथा (२ तास १८.४४ मिनिटे)
२. शेर सिंग (२ तास २४.०० मिनिटे)
३. दुर्गा बहादूर बुधा (२ तास २४.०३ मिनिटे)

भारतीय महिला
१. सुधा सिंग (२ तास ४५.३० मिनिटे)
२. ज्योती गावते (२ तास ४९.१४ मिनिटे)
३. श्यामली सिंग (२ तास ५८.४४ मिनिटे)

अर्ध मॅरेथॉन
१. पारुल चौधरी (१ तास १५.३७ मिनिटे)
२. आरती पाटील (१ तास १८.०३ मिनिटे)
३. मोनिका आथरे (१ तास १८.३३ मिनिटे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -