धक्के मारुन बाहेर काढण्याआधी धोनीने निवृत्त व्हावे; गावस्करची जीभ घसरली

भारताची माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Mumbai
sunil gavaskar says MS Dhoni should go without being pushed out
गावसकरांची भविष्यवाणी; धोनीनं स्वतःहून निवृत्ती घ्यावी, नाहीतर...

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत आक्षेपार्ह विधान करून माजी कर्णधार सुनील गावस्करने क्रिकेटप्रेमींचा रोष ओढवून घेतला आहे. ‘संघातून धक्के मारुन बाहेर काढण्याआधी धोनीने निवृत्त व्हावे’, असे सांगत  गावस्करने धोनी आणि त्याच्या जगभरातील तमाम चाहत्यांचा मोठा अपमान केला आहे. गावस्करने धोनीने आता निवृत्ती जाहीर करावी, असे सरळ सांगितले असते तरी चालले असते, पण भारतीय संघाला नव्हे तर गावस्करला धोनी भार झाला आहे, असाच उद्दामपणा त्याच्या बोलण्यातून जाणवला. गावस्करचा रोख हा नेहमीच वैयक्तिक रेकार्ड बनवण्याकडे असे तर धोनी नेहमीच संघासाठी स्वत:ला झोकून देताना दिसतो, त्यामुळे गावस्करने धोनीबाबत केलेले भाष्य हे अनाठायी आणि अविचारी वाटते.

आता भारतीय संघ व्यवस्थापनाने धोनीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गावस्करने हे आपले ज्ञान पाजळले. मात्र आपण काय बोलून गेलो याची कल्पना येताच त्याने सारवासारव केली. भारतीय क्रिकेटसाठी धोनीने मोठे योगदान दिले आहे, मात्र आता नवीन पर्यायाचा विचार करण्याची वेळ आली आहे. आता भारतीय संघ व्यवस्थापनाने धोनीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. नवोदित खेळाडूंना आता अधिकाधिक संधी मिळायला हवी. आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार केला तर माझ्या दृष्टीकोनातून धोनीला संघात स्थान नाही. टी-२० क्रिकेटमध्ये आता ऋषभ पंतलाच संधी मिळायला हवी.

भारतीय क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याबद्दल केवळ तोच सांगू शकतो

तुम्हाला ऋषभ पंतला पर्याय म्हणून विचार करायचा असेल तर मी संजू सॅमसनचे नाव सुचवेन. संजू चांगली फलंदाजी करतो आणि तो उत्तम यष्टीरक्षक आहे. धोनीच्या मनात काय आहे हे सध्यातरी कुणालाच माहीत नाही. भारतीय क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याबद्दल केवळ तोच सांगू शकतो. पण मला वाटते आज तो ३८ वर्षांचा आहे. भारतीय संघाने आता पुढचा विचार करायला हवा. कारण, पुढील टी-२० विश्वचषकापर्यंत तो ३९ वर्षांचा असेल,’ असं गावस्कर म्हणाला.‘धोनी संघात असणे आजही फायदेशीर आहे हे खरे आहे. तो किती धावा करतो किंवा यष्टीमागे कशी कामगिरी करतो, यापेक्षा मैदानात त्याचे असणे हे संघाच्या कर्णधाराला धीर देणारे असते. त्याच्या सल्ल्याचा मोठा फायदा होतो. असे असले तरी आता ती (निवृत्तीची) वेळ आलीय. भारताला दोनदा विश्वचषक विजयाचा मान मिळवून देणार्‍या धोनीने सन्मानाने जायला हवे,’ असेही गावस्कर पुढे जाऊन सांगतो.

धोनीच्या खेळावर मनापासून प्रेम करणार्‍या रसिकांना दुखावले

न्यूझीलंड विरुद्ध पराभव होऊन भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यापासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. भारत-वेस्ट इंडिजच्या मालिकेतूनही त्याने माघार घेतली होती. सध्या सुरू असलेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याचा समावेश नाही. त्यामुळे धोनीची निवृत्ती हा सध्या भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. मात्र स्ट्रेट ड्राईव्हसाठी प्रसिद्ध असलेल्या गावस्करने आपल्या शैलीच्या विरोधात जात मिडविकेटच्या डोक्यावरून फटका मारल्यासारखा करून धोनीच्या खेळावर मनापासून प्रेम करणार्‍या रसिकांना दुखावले आहे.

कपिल, सचिनचीही निवृत्ती वादग्रस्त

भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देव आणि विक्रमांचा बादशहा सचिन तेंडुलकर यांचीही निवृत्ती वादग्रस्त ठरली होती. एकेकाळी आपल्या भेदक गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवणार्‍या कपिलचे अखेरच्या दिवसांत चेंडू धड फलंदाजांपर्यंत पोहचत नव्हते. तीच बाब सचिनची होती. आपल्या शेवटच्या सामन्यांमध्ये फलंदाजी करत असताना सचिन काही वेळा चक्क खाली बसत होता. त्याचे पाय अपेक्षेप्रमाणे हालत नव्हते. या महान खेळाडूंना कधी निवृत्त होणार? असे प्रश्न विचारले गेले होते. त्यावेळी मात्र कोणी त्यांना धक्के मारून बाहेर काढण्याची भाषा वापरली नव्हती.

गावस्करने समीक्षण करण्यापलीकडे केले काय?

सत्तरीच्या दशकात जगातील वेगवान गोलंदाजांचा मुकाबला करत भारतीय फलंदाजीला नवा आयाम देणार्‍या गावस्करकडून निवृत्तीनंतर भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. पण, त्याने प्रशिक्षकाची कधीच मोठी जबाबदारी घेतली नाही. नवीन गुणवान खेळाडूंना शोधून त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही त्याने कधी घेतली नाही. विशेष म्हणजे राज्य सरकारने त्याला प्रशिक्षण देण्यासाठी अंधेरीला दिलेला भूखंड बरीच वर्षे त्याने वापराविना तसाच पडून ठेवला. शेवटी त्याच्याकडून तो भूखंड काढून घेण्याची वेळ सरकारवर आली. याचबरोबर आपल्या मूळ गावी वेंगुर्ल्याला तेथील नगर परिषदेने आपल्या स्टेडियमला गावस्करचे नाव दिले आहे. पण, त्याला अजूनही तिथे जाऊन आपुलकीने  भेट द्यावीशी वाटले नाही.