घरक्रीडासर्फराजला पाक कर्णधारपदावरून हटवावे; प्रशिक्षक आर्थरची शिफारस

सर्फराजला पाक कर्णधारपदावरून हटवावे; प्रशिक्षक आर्थरची शिफारस

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सर्फराज अहमदची संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करावी, अशी शिफारस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) क्रिकेट समितीला केली आहे. तसेच पाकिस्तान संघाच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणीही आर्थर यांनी क्रिकेट समितीकडे केली आहे.

क्रिकेट समितीने पाकिस्तान संघाच्या मागील तीन वर्षांमधील कामगिरीचे पुनरावलोकन केले. या तीन वर्षांमध्ये पाकिस्तानच्या संघाच्या प्रदर्शनात बरेच चढ-उतार होते. पाकिस्तानने २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले, पण नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात त्यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. ९ पैकी ५ साखळी सामनेच जिंकता आल्याने त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही.

- Advertisement -

कसोटी क्रिकेटमधीलही त्यांचे प्रदर्शन साधारण होते. ते सध्या जागतिक कसोटी क्रमवारीत सातव्या स्थानी आहेत. त्यामुळे सर्फराजला कर्णधारपदावरून हटवण्यात यावे, अशी शिफारस आर्थर यांनी पीसीबीच्या क्रिकेट समितीकडे केली आहे. तसेच कसोटी संघाचे नेतृत्त्व फलंदाज बाबर आझमकडे, तर मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्त्व लेगस्पिनर शादाब खानकडे सोपवण्यात यावे असेही आर्थर यांनी क्रिकेटी समितीला सांगितले आहे.

आर्थर आणि सहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ १५ ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. आर्थर हे २०१६ सालच्या मध्यापासून पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. पाक संघ जागतिक टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी खालावली. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार आर्थर यांनी केलेल्या सादरीकरणने क्रिकेट समितीचे दोन सदस्य प्रभावित नाहीत. आर्थर यांनी २०१८ मध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक स्टिव्ह रिक्सन यांना काढल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती, जी क्रिकेट समितीच्या सदस्यांना फारशी आवडली नाही. त्यामुळे ते प्रशिक्षकपदी कायम राहण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

- Advertisement -

पीसीबीने आर्थर यांचा कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतल्यास श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने हा प्रशिक्षकपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल संघ मुंबई इंडियन्सने दमदार प्रदर्शन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -