IPL 2020 : सूर्यकुमार यादवने राजस्थानविरुद्ध अचूक फटके मारले! 

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा फलंदाजाची स्तुती केली.

suryakumar yadav
सूर्यकुमार यादव

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार कुमारला यंदाच्या आयपीएलमध्ये जवळपास प्रत्येकच सामन्यात चांगली सुरुवात मिळत होती. परंतु, तो चुकीचा फटका मारून बाद होताना पाहायला मिळाले होते. राजस्थान रॉयल्सविरुद्ध मात्र सूर्यकुमारने अगदी योग्य फटके मारले आणि त्याची फटकेबाजी वाखाणण्याजोगी होती, अशा शब्दांत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा फलंदाजाची स्तुती केली. सूर्यकुमारने राजस्थानविरुद्ध अवघ्या ४७ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. हे त्याचे यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक ठरले.

मी त्याच्याशी चर्चा केली

सूर्यकुमार चांगल्या फॉर्मात होता. तो उत्तम फलंदाजी करायचा, पण चुकीचा फटका मारून बाद व्हायचा. या सामन्याआधी मी त्याच्याशी चर्चा केली. त्याला प्रत्येकच सामन्यात चांगली सुरुवात मिळत होती. मात्र, याचा उपयोग करून त्याने मोठी खेळी करणे गरजेचे होते. त्यासाठी त्याने योग्य ते फटके मारणे आवश्यक होते आणि या सामन्यात त्याने अचूक फटके मारले. त्याने अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी केली पाहिजे असे आम्हाला वाटत होते. तो मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारू शकतो. तसेच त्याच्याकडे इतरांपेक्षा वेगळे फटके मारण्याची क्षमता आहे आणि याचा फायदा अखेरच्या षटकांमध्ये झाला, असे रोहित म्हणाला.

कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी

सूर्यकुमारने मुंबईकडून खेळताना मागील दोन आयपीएल मोसमांत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्याने २०१८ मध्ये १४ सामन्यांत ५१२ धावा आणि २०१९ मध्ये १६ सामन्यांत ४२४ धावा केल्या होत्या. त्याने यंदाच्या मोसमाचीही चांगली सुरुवात करताना ६ सामन्यांत ३६ च्या सरासरीने १८० धावा केल्या आहेत. राजस्थानविरुद्ध केलेली नाबाद ७९ धावांची खेळी ही सूर्यकुमारच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.