घरक्रीडाटी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक, पण हुशारीने फलंदाजी गरजेची!

टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक, पण हुशारीने फलंदाजी गरजेची!

Subscribe

 शिखर धवनचे मत

टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी असो की गोलंदाजी, पहिले सहा षटके सर्वात महत्त्वाची असतात. या षटकांमध्ये जो संघ सर्वोत्तम खेळ करतो त्याला टी-२० सामना जिंकण्याची जास्त संधी असते. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळणे गरजेचे असते, असे भारताचा सलामीवीर शिखर धवनला वाटते. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वच खेळाडू उत्सुक आहेत, पण मी या स्पर्धेसाठी विशेष योजना आखलेली नाही, असे शिखरने स्पष्ट केले.

टी-२० विश्वचषकात सलामीवीर म्हणून खेळताना सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत पहिल्या सहा षटकांत जास्तीतजास्त धावा करण्याचे माझे लक्ष्य असेल. मला आक्रमकपणे खेळायला आवडते. मात्र, जर खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत असेल किंवा संथ खेळपट्टी असेल, तर मला योजना बदलावी लागेल. आम्हाला पहिल्या सहा षटकांत ५०-५५ धावा करण्यात यश आल्यास अखेरच्या षटकांत आमचे फलंदाज आपला नैसर्गिक खेळ करू शकतील. डावाच्या सुरुवातीला चांगलीच फलंदाजी करणे हे माझे काम आहे. टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमकपणे, पण हुशारीने फलंदाजी करण्याचा मी प्रयत्न करतो, असे शिखर म्हणाला.

- Advertisement -

पंतचे भविष्य उज्ज्वल!

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतवर मागील काही काळात बरीच टीका झाली आहे. मात्र, त्याचा भारतीय आणि दिल्ली संघातील सहकारी शिखर धवनने त्याला पाठिंबा दर्शवला आहे. तुझ्याबद्दल काय लिहिले जात आहे किंवा बोलले जात आहे त्याकडे लक्ष देऊ नकोस, असे मी रिषभला नेहमी सांगतो. कारण त्याच गोष्टी सतत तुमच्या डोक्यात येत राहतात. त्यामुळे मी वर्तमानपत्र वाचत नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीला मीसुद्धा माझ्याबाबत काय बोलले जात आहे त्याकडे लक्ष द्यायचो. मात्र, हळूहळू मी दुर्लक्ष करण्यास शिकलो. रिषभ हा खूपच प्रतिभावान खेळाडू असून त्याचे भविष्य उज्ज्वल आहे, असे शिखर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -