टेलरची एकाकी झुंज; न्यूझीलंड ५ बाद २०३

Mumbai
रॉस टेलर

फिरकीपटू अकिला धनंजयाच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडची ५ बाद २०३ अशी अवस्था होती. या सामन्यात न्यूझीलंडकडून अनुभवी रॉस टेलरने एक बाजू लावून धरली. दिवसअखेर तो ८६ धावांवर नाबाद होता. ९ महिन्यांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणार्‍या श्रीलंकेच्या धनंजयाने ५७ धावांत न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला.

गॉल येथे होत असलेला हा जागतिक स्पर्धेतील श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा पहिला कसोटी सामना आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लेथम आणि जीत रवाल यांनी डावाची सावध सुरुवात केली. न्यूझीलंडची १० षटकांनंतर बिनबाद १५, तर २० षटकांनंतर बिनबाद ४६ अशी धावसंख्या होती. यानंतर अकिला धनंजयाने आपली जादू चालवत टॉम लेथम (३०) आणि विल्यमसन (०) यांना एकाच षटकात माघारी पाठवले. लंचआधीच्या अखेरच्या षटकात धनंजयानेच रवालला ३३ धावांवर स्लिपमध्ये उभ्या डी सिल्वाकरवी झेलबाद केले.

यानंतर टेलर आणि हेन्री निकोल्स यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी २८ षटकांत १०० धावांची भागीदारी केली. दरम्यान टेलरने ८६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील ३१ वे अर्धशतक होते. निकोल्सला मात्र अर्धशतक पूर्ण करता आले नाही. त्याला धनंजयाने ४२ धावांवर पायचीत पकडले. धनंजयानेच बीजे वॉटलिंगला एका धावेवर बाद करत पाचवी विकेट घेतली. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडची ६८ षटकांत ५ बाद २०३ अशी धावसंख्या होती.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : पहिला डाव ५ बाद २०३ (रॉस टेलर नाबाद ८६, हेन्री निकोल्स ४२, जीत रवाल ३३; अकिला धनंजया ५/५७) वि. श्रीलंका.