घरक्रीडाटीम इंडियाचा दर्जाच वेगळा -शोएब अख्तर

टीम इंडियाचा दर्जाच वेगळा -शोएब अख्तर

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा दर्जाच वेगळा आहे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. भारताने नुकतीच झालेली बांगलादेशविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकत भारताला धक्का दिला होता. दुसर्‍या आणि तिसर्‍या सामन्यातही बांगलादेशने झुंज दिली, पण भारताने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत ही मालिका आपल्या खिशात घातली. या मालिकेत विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हे अनुभवी खेळाडू खेळले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मा, लोकेश शिवम दुबे आणि दीपक चहर यासारख्या खेळाडूंनी केलेली कामगिरी उत्कृष्ट होती असे अख्तरला वाटते.

तिसर्‍या सामन्यात सर्वोत्तम संघ कोण हे भारताने दाखवून दिले. भारताने जरी पहिला सामना गमावला असला, तरी त्यांनी या मालिकेत दमदार पुनरागमन केले. खासकरून रोहित शर्माची फलंदाजी फारच उत्कृष्ट होती. रोहित हा खूप प्रतिभावान खेळाडू असून तो चांगल्या फॉर्मात असताना त्याला रोखणे अवघड असते, असे अख्तर म्हणाला.

- Advertisement -

तसेच भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसर्‍या सामन्याविषयी अख्तरने सांगितले, मला वाटले होते की हा सामना चुरशीचा होईल. मात्र, भारताने बांगलादेशपेक्षा चांगला खेळ करत हा सामना सहजपणे जिंकला. बांगलादेशने या मालिकेत भारताला झुंज दिली आणि याबाबत त्यांचे कौतुक केले पाहिजे. बांगलादेशच्या संघाला हरवणे कोणत्याही संघाला सोपे नसते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने या सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ विकेट्स मिळवल्या. टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा दीपक हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीने अख्तर प्रभावित झाला. दीपकच्या गोलंदाजीत मध्यमगती आणि सीम गोलंदाजीचे मिश्रण आहे. त्याने तिसर्‍या सामन्यात हॅट्ट्रिक घेणे ही उल्लेखनीय गोष्ट होती, असे अख्तर म्हणाला. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि आघाडीच्या फलंदाजांची फळी या भारतीय संघाच्या जमेच्या बाजू असून त्यांनी मधली फळी सुधारण्यावर भर दिला पाहिजे असे अख्तरने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -