घरक्रीडामालिका विजेत्या टीम इंडियाचा पराभव

मालिका विजेत्या टीम इंडियाचा पराभव

Subscribe

एखाद्या संघाने एखादी मालिका काही सामने शिल्लक असतानाच जिंकली तर उर्वरित सामन्यांत त्यांची कामगिरी खालावते हे काही नवीन नाही. याच गोष्टीचे दर्शन भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात घडले. ५ सामन्यांच्या या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकत मालिका जिंकणार्‍या भारताला चौथ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. ट्रेंट बोल्टच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना ८ विकेट राखून जिंकला. मात्र, निकालापेक्षाही भारताचे या सामन्यातील प्रदर्शन निराशाजनक होते. भारताचा संपूर्ण संघ ९२ धावांवर माघारी परतला. ही सिडन पार्क, हॅमिल्टनच्या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर शिखर धवनने १ चौकार आणि १ षटकार लगावत डावाची सुरुवात केली, पण ट्रेंट बोल्टने धवनला १३ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शुभमन गिल फलंदाजीला आला. दुसर्‍या बाजूला आपला २०० वा एकदिवसीय सामना खेळणारा रोहित शर्मा फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यालाही बोल्टनेच माघारी पाठवले. यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने एकाच षटकात अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांना बाद केले. या दोघांनाही आपले खाते उघडता आले नाही, तर पुढच्याच षटकात बोल्टने गिलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

- Advertisement -

गिलला ९ धावाच करता आल्या. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार हे दोघेही १-१ धाव करून बाद झाले. हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने ४ चौकार लगावत झटपट १६ धावा केल्या, पण बोल्टनेच त्यालाही माघारी पाठवले. ही बोल्टची पाचवी विकेट होती. पुढे युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांनी २५ धावांची भागीदारी करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. मात्र, टॉड अ‍ॅस्टलने कुलदीपला १५ धावांवर बाद केले, तर निशमने खलील अहमदला त्रिफळाचित करत भारताचा डाव संपवला. भारताला ३०.५ षटकांत अवघ्या ९२ धावा करता आल्या.

९३ धावांचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल (१४) आणि केन विल्यम्सन (११) यांना भुवनेश्वरने झटपट माघारी पाठवले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था २ बाद ३९ अशी झाली होती. मात्र, यानंतर या मालिकेत पहिल्यांदाच सलामी करणार्‍या हेन्री निकोल्स आणि अनुभवी रॉस टेलरने चांगली फलंदाजी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. ५ विकेट घेणार्‍या बोल्टलाच सामनाविराचा पुरस्कार मिळाला. आता या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना रविवारी वेलिंग्टन येथे होणार आहे.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

भारत : ३०.५ षटकांत सर्व बाद ९२ (युझवेंद्र चहल १८*, हार्दिक पांड्या १६, कुलदीप यादव १५; ट्रेंट बोल्ट ५/२१, डी ग्रँडहोम ३/२६) पराभूत वि. न्यूझीलंड १४.४ षटकांत २ बाद ९३ (रॉस टेलर ३७*, हेन्री निकोल्स ३०*; भुवनेश्वर २/२५).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -