Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर क्रीडा आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये टीम इंडियाची संघनिवड चुकतेय!

आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये टीम इंडियाची संघनिवड चुकतेय!

भारतीय संघाने बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या केल्या आहेत, पण संघनिवड त्यापैकी एक नाही, असे नासिर हुसेनला वाटते.

New Delhi

आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताची संघनिवड चुकत आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले. तसेच भारतीय संघ अव्वल तीन फलंदाजांवर जास्तच अवलंबून आहे असेही हुसेनला वाटते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक, तसेच २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकल्या. धोनीच्या नंतर नेतृत्वातची धुरा विराट कोहलीने सांभाळली. कोहलीच्या नेतृत्वातही भारतीय संघाला खूप यश मिळत आहे, पण त्यांना आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयश

भारतीय संघाला मागील काही वर्षांत आयसीसीच्या स्पर्धा जिंकता आलेल्या नाहीत, कारण त्यांची संघनिवड चुकत आहे असे मला वाटते. भारतीय संघाने बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या केल्या आहेत, पण संघनिवड त्यापैकी एक नाही. तसेच त्यांना बहुधा परिस्थिती आणि वातावरणाशी जुळवून घेण्यात काहीसे अपयश येत आहे. चेंडू स्विंग होत असल्यास तुम्ही थोडे सावधपणे खेळले पाहिजे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत २ बाद २० अशी अवस्था असेल आणि विराट कोहली, रोहित शर्मा बाद झाले असतील, तर भारताकडे मधल्या फळीत असा कोणता फलंदाज आहे जो त्यांचा डाव सावरू शकतो?, असा प्रश्न हुसेनने उपस्थित केला.

प्लॅन ‘बी’ गरजेचा 

भारताचे अव्वल तीन फलंदाज सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवर फारशी जबाबदारी नसते. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल, तर कोहली आणि रोहित शतके करतात व मधल्या फळीतील फलंदाजांना संधीच मिळत नाही. मग अचानक एका सामन्यात मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूडसारख्या गोलंदाजांविरुद्ध ३ बाद २० अशी अवस्था असल्यास भारताला अडचणीतून बाहेर कोण काढणार? केवळ प्लॅन ‘अ’ असून चालत नाही. तुमच्याकडे प्लॅन ‘बी’सुद्धा असावा लागतो. त्यामुळे अव्वल तीन खेळाडू लवकर बाद झाल्यावरही सामने जिंकवून देऊ शकतील असे फलंदाज आता भारताने शोधले पाहिजेत, असे हुसेनने नमूद केले.

कर्णधार म्हणून कोहलीत सुधारणा गरजेची

विराट कोहली हा खूप चांगला कर्णधार आहे. मात्र, त्याच्यात अजूनही थोडी सुधारणा गरजेची आहे, असे नासिर हुसेनला वाटते. कोहली स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो. कर्णधार म्हणून काही बाबतीत त्याच्यामध्ये सुधारणा झाली आहे. परंतु, अजूनही सुधारणेला वाव आहे. तो कधीतरी उगाचच संघात बदल करतो. कोहली संघनिवड करत नसून संघाची निवड करण्यासाठी ‘निवड समिती’ आहे असे लोक म्हणतात. मात्र, कोहलीचे मतही विचारात घेतले जात असेल, असे हुसेन म्हणाला.