घरक्रीडाकसोटी क्रिकेटने मला आणखी चांगला माणूस बनवले -कोहली

कसोटी क्रिकेटने मला आणखी चांगला माणूस बनवले -कोहली

Subscribe

कसोटी क्रिकेटने मला आणखी चांगला माणूस बनवले आहे, असे विधान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केले. कसोटी क्रिकेट हे आयुष्याप्रमाणे असून कठीण परिस्थितीत हार मानण्याचा पर्याय तुमच्याकडे नसतो, असेही कोहली म्हणाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आले असून सर्वांना घरीच राहावे लागत आहे. याचदरम्यान कोहलीने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि त्याचा आयपीएल संघातील माजी सहकारी केविन पीटरसनसोबत इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी या दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली.

  तुझा क्रिकेटचा सर्वात आवडता प्रकार कोणता आवडता प्रकार कोणता असे पीटरसनने विचारले असता कोहली म्हणाला, कसोटी क्रिकेट, कसोटी क्रिकेट, कसोटी क्रिकेट, कसोटी क्रिकेट, ककसोटी क्रिकेट. मी हे पाच वेळा म्हणालो. कसोटी क्रिकेट हे आयुष्याप्रमाणे आहे. तुम्ही धावा केल्या असतील अथवा नसतील, तुम्हाला इतर फलंदाजांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यावेच लागते. तुम्हाला स्वतःच्या खोलीत जाऊन दुसर्‍या दिवशी पुन्हा उठून मैदानात यावे लागते. आवडो वा न आवडो, तुम्हाला हे करावेच लागते. आयुष्याचेही असेच आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. तुम्ही हार मानू शकत नाही. कसोटी क्रिकेटने मला आणखी चांगला माणूस बनवले आहे.

- Advertisement -

सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोहलीने ८६ कसोटी सामन्यांत २७ शतकांच्या मदतीने ७२४० धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता आयसीसी पाच दिवसांचे कसोटी सामने चार दिवसांचे करण्याचा विचार करत आहे. मात्र, कोहलीने याला विरोध दर्शवला होता आणि पीटरसनला ही गोष्ट आवडली. मला एका कार्यक्रमात चार दिवसांच्या कसोटी सामन्यांबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मी त्यांना सांगितले की, जर विराट कोहली याला विरोध दर्शवत असेल, तर चार दिवसांचे सामने होऊच शकत नाहीत, असे पीटरसन म्हणाला.

’या’ दोघांसोबत फलंदाजी करायला आवडते!
मला महेंद्रसिंग धोनी आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यासोबत फलंदाजी करायला आवडते, असे कोहली पीटरसनशी चर्चा करताना म्हणाला. मला त्यांच्यासोबत फलंदाजी करताना मजा येते, ज्यांना मी कसा धावतो हे कळते. मी धाव काढण्यासाठी कधी हाक मारणार हे तुम्हाला कळले पाहिजे. मला धोनी आणि एबीसोबत फलंदाजी करायला आवडते. आम्हाला धाव काढण्यासाठी हाकही द्यावी लागत नाही, आम्हाला एकमेकांकडे बघूनच ते समजते, असे कोहलीने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -