घरक्रीडाकसोटी क्रिकेट सर्वात महत्त्वाचे!

कसोटी क्रिकेट सर्वात महत्त्वाचे!

Subscribe

वेस्ट इंडिजचा विस्फोटक सलामीवीर क्रिस गेल हा त्याच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम त्याच्याच नावे आहे. आक्रमक शैलीतील फलंदाजीमुळेच त्याने जगभरात आपले असंख्य चाहते निर्माण केले आहेत. परंतु, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटसोबतच त्याने कसोटी क्रिकेटमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने १०३ कसोटी सामन्यांत विंडीजचे प्रतिनिधित्व करताना ७२१४ धावा केल्या असून यात दोन त्रिशतकांचा समावेश आहे. त्यामुळे आता काही चाहते आणि खेळाडू कसोटीकडे पाठ फिरवत असले तरी हाच क्रिकेटचा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे असे गेलला वाटते.

कसोटी हा क्रिकेटचा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. कसोटी क्रिकेटमुळे तुम्हाला जगायचे कसे हे शिकण्याची संधी मिळते. सलग पाच दिवस मैदानात उभे राहून क्रिकेट खेळणे आव्हानात्मक आहे. ही तुमच्या संयमाची परीक्षाच असते. तुम्हाला पाच दिवसांत विविध परिस्थितींचा सामना करावा लागतो. परंतु, या अनुभवामुळे तुम्हाला शिस्त लागते. तसेच कठीण परिस्थितीचा सामना कसा करायचा आणि त्यावर मात कशी करायची, हेसुद्धा तुम्हाला कसोटी क्रिकेट शिकवते. तुम्ही मानसिकदृष्टया किती कणखर आहात हे कळायला तुम्हाला कसोटी क्रिकेटची मदत होते, असे गेल म्हणाला.

- Advertisement -

बर्‍याच खेळाडूंना क्रिकेटमध्ये फार पुढे जाण्यात अपयश येते. त्यांना तू काय सल्ला देशील असे विचारले असता गेलने सांगितले की, तुमच्यात जिद्द असणे गरजेचे आहे. एका गोष्टीत अपयश आले, तर तुम्ही दुसर्‍या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द न घडल्याने दुःखी होण्याचे कारण नाही. क्रिकेट पलीकडेही सुंदर आयुष्य आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -