कसोटी क्रिकेटला बदलांची गरज!

डे-नाईट सामन्याबाबत सौरव गांगुलीचे विधान

Mumbai

कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांनी वळण्यासाठी काही बदलांची गरज होती, असे विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने केले. भारतीय संघ येत्या शुक्रवारपासून बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आपला पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. बीसीसीआयने याआधी डे-कसोटी खेळण्यास नकार दिला होता, पण गांगुलीची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बीसीसीआयच्या विचारसरणीत बदल झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील सामने पाहण्यासाठी फारसे प्रेक्षक उपस्थित नव्हते. मात्र, कोलकाता येथे होणार्‍या भारताच्या पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे वळवण्यासाठी काही बदलांची गरज होती. डे-नाईट कसोटी सामने ही अप्रतिम संकल्पना असून जगभरात सामने झाले आहेत. भारतातही डे-नाईट कसोटी सामने होणे गरजेचे होते, कारण क्रिकेटमध्ये भारत हा सर्वात बलाढ्य देश आहे, असे गांगुली म्हणाला.

बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असताना गांगुलीने कोलकातामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २०१६ टी-२० विश्वचषकाचा सामना यशस्वीरीत्या आयोजित केला होता. मात्र, डे-नाईट कसोटी सामन्याचे आयोजन अधिक आव्हानात्मक आहे, असे गांगुलीला वाटते. त्याने याबाबत सांगितले, चाहत्यांना मैदानापर्यंत घेऊन येणे हे आव्हान आहे. भारत-पाकिस्तानचा सामना कुठेही होत असला तरी चाहते तो पाहण्यासाठी येणारच. मात्र, कसोटी सामना पाहण्यासाठी ६५,००० चाहत्यांना स्टेडियमकडे वळवणे अवघड होते. परंतु, पहिल्या तीन दिवसांची सर्व तिकिटे विकली गेल्याचे मला समाधान आहे.

भरलेल्या स्टेडियममध्ये खेळणे कोहलीला आवडेल!

भारताच्या पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यात भरलेले स्टेडियम पाहून कर्णधार विराट कोहलीला आनंद होईल, असे सौरव गांगुली म्हणाला. विराट हा महान खेळाडू असून त्याच्यासारख्या खेळाडूने भरलेल्या स्टेडियममध्येच खेळले पाहिजे. तो जेव्हा पहिल्या दिवशी फलंदाजीला उतरेल, तेव्हा त्याला भरलेले स्टेडियम पाहून आनंद होईल. भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंनी रिकाम्या स्टेडियममध्ये खेळता कामा नये. चाहत्यांनी स्टेडियममध्ये येऊन त्यांच्या खेळाचा आनंद घेतला पाहिजे, असे गांगुलीने नमूद केले.