कसोटी क्रमवारी : स्टिव्ह स्मिथ अव्वल स्थानी कायम

Mumbai
स्टिव्ह स्मिथ

स्टिव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयसीसीच्या ताज्या जागतिक कसोटी क्रमवारीतील अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाने नुकत्याच झालेल्या अ‍ॅशेस मालिकेच्या चौथ्या सामन्यात १८५ धावांनी विजय मिळवला. स्मिथने २११ आणि ८२ धावा करत, तर कमिन्सने २ डावांमध्ये मिळून ७ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

स्मिथने अ‍ॅशेस मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेतील ५ डावांमध्ये १३४.२ च्या सरासरीने ६७१ धावा केल्या आहेत. यामध्ये १ द्विशतक, २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे त्याने आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. सध्या त्याच्या खात्यात ९३७ गुण झाले आहेत. दुसर्‍या स्थानी असलेल्या विराट कोहलीचे ९०३ गुण आहेत. त्यामुळे स्मिथचे कोहलीपेक्षा ३४ गुण जास्त आहेत. कोहलीने विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत साधारण कामगिरी केली. या मालिकेच्या ४ डावांमध्ये केवळ १३६ धावा केल्या. त्यामुळे त्याची घसरण झाली आहे. या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन ८७८ गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे.

गोलंदाजांमध्ये कमिन्सने ९१४ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यामुळे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गुणांशी बरोबरी केली. तसेच त्याच्यात आणि दुसर्‍या स्थानी असणार्‍या कागिसो रबाडामध्ये तब्बल ६३ गुणांचा फरक आहे. भारताचा जसप्रीत बुमराह तिसर्‍या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूडने अ‍ॅशेस मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याने यावर्षी पहिल्यांदा अव्वल १० गोलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे.

बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना अफगाणिस्तानने २२४ धावांनी जिंकला. याचा अफगाणिस्तानच्या खेळाडूंना फायदा झाला आहे. या सामन्यात ९२ आणि ५० धावा करणार्‍या असगर अफगाणने फलंदाजांमध्ये ११० व्या स्थानावरून थेट ६३ व्या स्थानी झेप घेतली आहे. कर्णधार राशिद खानने या सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आणि पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ६९ व्या स्थानावरून ३७ व्या स्थानी पोहोचला आहे. बांगलादेशचे फिरकीपटू शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम अनुक्रमे २१ आणि २२ व्या स्थानी आहेत.

-अव्वल तीन फलंदाज
१.स्टिव्ह स्मिथ (९३७ गुण)२. विराट कोहली (९०३ गुण)३. केन विल्यमसन (८७८ गुण)

-अव्वल तीन गोलंदाज
१. पॅट कमिन्स (९१४ गुण)२. कागिसो रबाडा (८५१ गुण)३. जसप्रीत बुमराह (८३५ गुण)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here