भारताच्या हॉकी संघांत कोणालाही नमवण्याची क्षमता!

Mumbai

भारताच्या संघांमध्ये कोणत्याही संघाचा पराभव करण्याची क्षमता आहे, असा विश्वास पुरुष संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि महिला संघाची कर्णधार राणी रामपाल यांनी आगामी ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेआधी व्यक्त केला. जपानमध्ये होणार्‍या या स्पर्धेला येत्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. याचवर्षी नोव्हेंबरमध्ये होणार्‍या २०२० ऑलिम्पिक पात्रता फेरीआधी या स्पर्धेत दोन्ही संघांना सरावाची चांगली संधी मिळणार आहे.

ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत सहभागी होणार्‍या पुरुष संघांमध्ये भारतासह जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असणार्‍या मलेशिया, जागतिक क्रमवारीत ८ व्या स्थानी असणार्‍या न्यूझीलंड आणि यजमान जपान यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी भारताने बर्‍याच अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. मनप्रीत सिंगच्या अनुपस्थितीत या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करणार आहे. या स्पर्धेबाबत २३ वर्षीय हरमनप्रीत म्हणाला, ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत आमच्या संघातील युवा खेळाडूंना मलेशिया, जपान, न्यूझीलंडसारख्या संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे.

या संघांविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे हे युवा खेळाडू या स्पर्धेत कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. आम्ही आता नव्या प्रशिक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे खेळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही या स्पर्धेसाठी खूप सराव केला असून चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहोत. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्याच्या उद्देशाने खेळू. भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

दुसरीकडे जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असणार्‍या भारतीय महिला संघासमोर जपान, चीन आणि जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. मागील वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत याच ऑस्ट्रेलियाने भारताचा १-० असा पराभव केला होता. मात्र, या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासह सर्वच संघांविरुद्ध दमदार कामगिरी करण्याचा राणीला विश्वास आहे. ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेतील सर्वच सामने आव्हानात्मक असणार आहेत, पण आम्ही या स्पर्धेत दमदार कामगिरी करू याची मला खात्री आहे. आम्ही या स्पर्धेत कोणत्याही संघाचा पराभव करू शकतो. या स्पर्धेतील कामगिरीमुळे आमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असे राणी म्हणाली. राणीच्या महिला संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना शनिवारी जपानविरुद्ध होणार आहे.