कोणत्या क्रमांकावर खेळायचे कर्णधारच ठरवेल – शिखर धवन

शिखर धवन

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात डेविड वॉर्नर आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंच या सलामीवीरांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने भारतावर १० विकेट राखून मात केली. या सामन्याआधी लोकेश राहुल आणि शिखर धवनपैकी रोहित शर्माचा सलामीचा साथी कोण असणार यावर बरीच चर्चा सुरु होती.

मात्र, संघ व्यवस्थापनाने धवनलाच सलामीला पाठवत राहुलला तिसर्‍या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नेहमी तिसर्‍या क्रमांकावर खेळणार्‍या कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागले. कोहली केवळ १६ धावा करुन माघारी परतला. कोहलीने खालच्या क्रमांकावर खेळणे हे त्याच्या आणि संघाच्याही हिताचे नाही, असे मत अनेक क्रिकेट समीक्षक व्यक्त करत आहेत. मात्र, कोणत्या क्रमांकावर खेळायचे हा निर्णय कर्णधाराचा आहे, असे सामन्यानंतर धवन म्हणाला.

कोणत्या खेळाडूने कोणत्या क्रमांकावर खेळायचे हा निर्णय सर्वस्वी कर्णधाराचा आहे. राहुल सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याने मागील मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली. विराटने तिसर्‍या क्रमांकावर खेळताना फारच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे तो पुढील सामन्यात पुन्हा याच क्रमांकावर खेळण्याचा विचार करु शकेल. याबाबतचा निर्णय त्यानेच घ्यायचा आहे, असे धवनने स्पष्ट केले.

भारताने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली होती. त्यांची १ बाद १३४ अशी धावसंख्या होती. मात्र, त्यांनी पुढील नऊ विकेट अवघ्या १२१ धावांत गमावल्या. याबाबत धवन म्हणाला, राहुल बाद झाला तेव्हा आम्ही वेगाने धावा करण्याचा विचार करत होतो. मात्र, आम्ही झटपट चार विकेट गमावल्या. आम्ही ३०० धावांचा विचार करत होतो, पण ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्याने आम्हाला २५५ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीत आमच्यापेक्षा चांगला खेळ केला.