घरक्रीडावस्त्रहरण !

वस्त्रहरण !

Subscribe

केवळ अडीच दिवसांतच (खरंतर वानखेडेवरील सामना दोन दिवसातच संपला असता, अंधुक प्रकाश तसेच सुर्यग्रहणामुळे दुसर्‍या दिवशी खेळ उशिराने सुरू झाला. रेल्वेकडून मार खाण्याची आफत मुंबईवर ओढवली. 41 वेळा रणजी करंडकावर नाव कोरणार्‍या मुंबईची गेल्या काही वर्षातील रणजीतील कामगिरी विलक्षण घसरली आहे. जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, गुजरात (दोनदा) महाराष्ट्र आणि आता रेल्वेनेही मुंबईवर निर्णायक विजय मिळवून बोनस गुणासह सात घसघशीत गुणांची कमाई केली. मुंबईच्या खेळाडूंची खडूस वृत्ती लोप पावत असल्याचे चित्र अलीकडे वारंवार दिसून येते.

वानखेडेच्या हिरव्यागार खेळपट्टीवर पहिल्या दिवशी उपहाराआधीच मुंबईचा डाव 114 धावातच आटोपला अशी आपत्ती मुंबईवर प्रथमच ओढवली. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर या कसोटी पटूंसह सुर्यकुमार यादव, आदित्य तरे, या आजीमाजी कर्णधारांचा मुंबई संघात समावेश होता. प्रतिस्पर्धी रेल्वेकडे मात्र कर्णधार कर्ण शर्मा या एकमेव कसोटीपटूचा अपवाद वगळता नवोदित खेळाडूंचाच भरणा होता. टी.प्रदिप, हिमांशु सांगवान, अमित मिश्रा या रेल्वेच्या अनुनभवीत मध्यमगती त्रिकुटासमोर मुंबईची दाणादाण उडाली तीदेखील एकदा नव्हे तर दोनदा ! सामन्यात मुंबईला दोनशेचा टप्पा पार करता आला नाही तसेच दोन्ही डावात 100 षटकेही मुंबईचा डाव चालला नाही. अलिकडच्या काळात मुंबईच्या फलंदाजीचे असे वस्त्रहरण क्वचितच बघायला मिळाले आहे, तेदेखील घरच्या मैदानात, वानखेडेवर !भारताचे माजी गोलंदाज तसेच रेल्वेचे प्रशिक्षक हरविंदर सिंग यांनी रेल्वेच्या विजयाचे श्रेय प्रदीप, हिमांशु, अमीत या तेज त्रिकुटाला दिले. खेळपट्टी, वातावरणाचा रागरंग ओळखुन या त्रिकुटाने अचूक मार्‍यावर भर दिला याउलट मुंबईच्या अनुभवी गोलंदाजाने नाहक शक्ती खर्च करुन स्वैर मारा केला. परिणामी कर्ण शर्माने आपला सारा अनुभवपणाला लावत नाबाद शतक झळकावून रेल्वेला 150 धावांची आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

रेल्वेविरुध्दच्या सामन्यात मुंबईची गोलंदाजी पार ढेपाळली. संघातील सिनियर्सनी गोलंदाजांना मार्गदर्शन करायला हवे होते. खासकरुन पदार्पण करणार्‍या दिपक शेट्टी, तुषार देशपांडे यांना चार धीराचे शब्द दिले असते तर फरक पडला असता. परंतु, जेष्ठ खेळाडूंनी गप्प बसणे पसंत केल्याचे चित्र दिसत होते. संघात एकजिनसेतचा अभाव प्रकर्षाने जाणवला.
मुंबईच्या या दारुण पराभवाचे पडसाद सर्वत्र उमटणे स्वाभाविकच आहे. नूतन वर्षात कर्नाटकासारख्या बलवान संघाशी मुंबईचा मुकाबला 3-6 जानेवारी दरम्यान बीकेसी वर होईल. रेल्वेकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई संघात काही बदल करण्यात आले आहे. जय बिश्तला वगळून सर्फराझ खानची निवड करण्यात आली आहे. शार्दुल ठाकूरचा श्रीलंकेविरुध्दच्या आगामी टी-20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आल्यामुळे त्याच्याऐवजी मुंबई संघात रॉयस्टन डायसला संधी लाभेल.

रेल्वे विरुध्दच्या सामन्यात श्रेयस अय्यर, शिवम दुबे यांना विश्रांती देण्यात आली. दोघेही नौजवान खेळाडू, अलिकडेच त्यांचा खास करुन शिवम दुबेचा भारतीय संघात समावेष करण्यात आला असुन त्याला विश्रांती देण्यात आली. याचा फटका मुंबईला बसला. आपल्या मर्जीनुसार मुंबईकडून खेळायचे या वृत्तीला आळा बसायला हवा. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याबाबत कठोर पावले उचलायला हवीत. अन्यथा बेशिस्तीला आळा घालणे कठीण जाईल.
मुंबई संघातील जुन्या खोडांना वगळून नवोदितांना संधी देण्याची वेळ आलेली आहे. काही खेळाडू जागा अडवून बसले आहेत. त्यांना डच्चू देण्याची वेळ आली आहे. मिलिंद रेगे यांच्या निवड समितीने कडक धोरण अवलंबिल्यास याला आळा बसेल.

- Advertisement -

कर्नाटकाच्या लढतीनंतर मुंबईला तामिळनाडू (चेन्नई) उत्तर प्रदेश (मुंबई), हिमाचल प्रदेष (धरमशाला) सौराष्ट्र (राजकोट), मध्य प्रदेश (मुंबई) या संघांशी झुंज दयावी लागेल. रणजी एलिट लढतींच्या ‘अ’ आणि ‘ब’ गटात अव्वल 5 संघ बाद फेरीत प्रवेश करतील. दोन सामन्यातून मुंबईचे सहा गुण झाले आहेत. सलामीच्या लढतीत मुंबईने बडोद्यावर निर्णयाक विजय मिळविला. परंतु, वानखेडेवर मुंबईला रेल्वेकडून पराभवाचा धक्का बसला. रणजी स्पर्धेत आपल्या गतलौकिकाला साजेषी कामगिरी करण्यासाठी मुंबईला आपला खेळ उंचवावा लागेल अन्यथा यंदाही साखळीतच गारद होण्याची आपत्ती ओढवू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -