घरक्रीडामुंबईचा लाजिरवाणा पराभव

मुंबईचा लाजिरवाणा पराभव

Subscribe

रेल्वेची बोनससह ७ गुणांची कमाई,रणजी करंडक

नवनव्या संघांकडून मात खाण्याची (निर्णायक पराभव) सवय अलीकडे मुंबई रणजी संघाच्या अंगवळणी पडू लागली आहे. मागील काही वर्षांत जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, गुजरातने (लागोपाठ दोनदा) पराभवाचा धक्का दिला आहे. आता रेल्वेनेही मुंबईला मुंबईतच वानखेडेवर हरवण्याची किमया केली. शुक्रवारी रेल्वेने मुंबईवर १० गडी राखून आरामात विजय संपादला आणि बोनससह निर्णायक विजयाचे सात गुण वसूल केले. त्यामुळे तीन सामन्यांनंतर रेल्वेच्या खात्यात १० गुण असून मुंबईचे सामन्यांतून ६ गुण झाले आहेत.

मुंबईच्या दुसर्‍या डावात हिमांशू सांगवानने निम्मा संघ ६० धावांत गारद केला. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे या कसोटीपटूंसह सिद्धेश लाड, शम्स मुलानी आणि दीपक शेट्टी यांना त्याने पॅव्हेलियनची वाट दाखवली. टी.प्रदीपने जय बिस्ता आणि अनुभवी आदित्य तरेचा अडसर दूर केला. कर्णधार सूर्यकुमार यादवने (९४ चेंडूत ६५ धावा) मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेचा कर्णधार करण शर्माने त्याला चकवले. करणनेच शार्दूल ठाकूरला स्लिपमधील मृणाल देवधरकरवी झेलबाद केले.

- Advertisement -

मुंबईने डावाचा मारा टाळला तो शार्दूल (२१) आणि आकाश पारकर (नाबाद ३५) या आठव्या जोडीच्या २९ धावांच्या भागीदारीमुळे! तिसर्‍या दिवशी उपहारानंतर मुंबईचा दुसरा डाव १९८ धावांवर आटोपला. त्यामुळे रेल्वेला हा सामना जिंकण्यासाठी ४७ धावांचे आव्हान मिळाले. कसोटीपटूंचा समावेश असलेल्या मुंबईला दोन्ही डावांत २०० चीही मजल मारता आली नाही. तसेच मुंबईचे रथीमहारथी दोन्ही डावांत मिळून ९१.३ षटकेच खेळपट्टीवर टिकाव धरू शकले.

मृणाल देवधर (नाबाद २७) आणि प्रथम सिंग (नाबाद १९) यांनी जेमतेम १२ षटकातच ४७ धावा फटकावून रेल्वेला तिसर्‍या दिवशी चहापानाआधीच हा सामना जिंकवून दिला. भारताचा आंतरराष्ट्रीय गोलंदाज शार्दूलची बळींची पाटी कोरीच राहिली. त्याच्या स्वैर मार्‍याचा फायदा रेल्वेच्या फलंदाजांनी घेतला. मुंबईच्या इतर गोलंदाजांनाही प्रभाव पाडता आला नाही.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – मुंबई : ११४ आणि १९८ (सूर्यकुमार ६५; सांगवान ५/६०, करण २/१५) पराभूत वि. रेल्वे : २६६ आणि बिनबाद ४७ (देवधर नाबाद २७, प्रथम नाबाद १९).

मुंबईचा भरकटलेला मारा – हरविंदर

मुंबईला मुंबईतच हरवण्याची किमया रेल्वेने प्रथमच केली. निर्णायक विजयाचे बोनससह ७ गुण मिळवल्यामुळे रेल्वे रणजी संघाचे प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू हरविंदर सिंग खुश होते. आतापर्यंत आम्हाला मुंबईवर कधीच निर्णायक विजय मिळवता आला नव्हता. पहिल्या डावातील आघाडीवर आम्ही याआधी मुंबईला कर्नेल सिंग, दिल्ली आणि वानखेडेवर पराभूत केले होते. मात्र, अनुभवी करण शर्माच्या शतकामुळे, तसेच अरिंदम घोष, यांच्या फलंदाजीमुळे रेल्वेला १५२ धावांची आघाडी मिळाली. प्रदीप, हिमांशू सांगवान आणि अमित मिश्रा या तेज त्रिकुटाने कौतुकास्पद कामगिरी केली. मुंबईच्या गोलंदाजांनी उत्साहाच्या भरात वेगवान मारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे त्यांचा चेंडूवरील ताबा सुटला, तसेच दिशा गमावली. त्यांच्या भरकटलेल्या मार्‍याचा करण, अरिंदम आणि अविनाशने पुरेपूर फायदा उठवला, असे मत प्रशिक्षक हरविंदर यांनी मांडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -