सुवर्ण सिंधू; जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय

Mumbai
f78r6ok_pv-sindhu-_625x300_25_August_19
सुवर्णपदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली

भारतीय बॅडमिंटनसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. सलग दोन वर्षे अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर अखेर भारताची स्टार खेळाडू पी.व्ही.सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यात यश आले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी सिंधू ही भारताची पहिली बॅडमिंटन खेळाडू आहे. याआधी सिंधूला या स्पर्धेत दोन वेळा रौप्य आणि दोन वेळा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने कोणतीही चूक केली नाही.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणार्‍या सिंधूने अंतिम सामन्यात ओकुहाराचा २१-७, २१-७ असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. सिंधूने सामन्याच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट खेळ केला. पहिल्या गेमच्या मध्यंतराला तिच्याकडे ११-२ अशी भक्कम आघाडी होती. मध्यंतरानंतर ओकुहाराने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिंधूने आपला दमदार खेळ सुरू ठेवत पहिला गेम अवघ्या १६ मिनिटांमध्ये २१-७ असा जिंकला. पहिल्या गेमप्रमाणे दुसर्‍या गेममध्ये सिंधूने अप्रतिम खेळ करत मध्यंतराला ११-४ अशी आघाडी मिळवली. यानंतरही सिंधूने ओकुहाराला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. तिने हा गेमही २१-७ असा मोठ्या फरकाने जिंकत इतिहास रचला.

आईला वाढदिवसाचे गिफ्ट!

मी याआधी दोन वेळा अंतिम सामन्यात पराभूत झाले होते. त्यामुळे यावेळी ही स्पर्धा जिंकणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. मी हे पदक माझ्या आईला समर्पित करू इच्छिते. आज तिचा वाढदिवस आहे, असे जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर सिंधू म्हणाली. तसेच तिने प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचेही आभार मानले.