घरक्रीडापहिल्या दिवशी जेमीसन तळपला

पहिल्या दिवशी जेमीसन तळपला

Subscribe

भारतीय फलंदाजीला पाडले खिंडार

येथे सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा अर्धा दिवस न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज काईल जेमीसनने गाजवला. पहिल्या दिवसाअखेरीस भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणे ३८ तर रिषभ पंत १० धावा करून नाबाद राहिले . न्यूझीलंडकडून काईल जेमीसनने ३८ धावा देऊन तीन बळी घेतले. वेलिंग्टनमध्ये आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच विकेट्सगमावून १२२ धावा केल्या. चहापानानंतरच पाऊस सुरू झाल्यामुळे शेवटच्या सत्रामध्ये खेळ झाला नाही त्यानंतर पंचांनी खेळपट्टीची तपासणी करून आजच्या दिवसाचा खेळ थांबविण्याची घोषणा केली.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्याच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरविला आणि पहिल्या सत्रात भारताने पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांचे विकेट्स गमावले. त्यानंतर मयांक अग्रवालने ८४ चेंडूत ३४ धावा केल्या. जम बसलेला असतानाच त्याने ट्रेंट बाउल्टला पूल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली तर हनुमा विहारी हा जेमीसनचा तिसरा बळी ठरला.

- Advertisement -

मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉच्या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. पृथ्वी शॉने स्क्वेअर कटवर दोन चौकार मारले. परंतु अयोग्य तंत्राचा फटका त्याला बसला. तो साऊथीच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर भरवशाच्या पुजाराला जेमिसनने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याच्या एका उसळणार्‍या चेंडूने पुजाराच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक बी.जे.वाटलिंगच्या हाती स्थिरावला. त्याचप्रकारे त्याने कोहलीला बाद करून भारताला सर्वात मोठा धक्का दिला. त्याने पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरकरवी कोहलीला झेलबाद केले.

काईल जेमिसन

- Advertisement -

बळी-3

षटके-14

धावा-38

निर्धाव षटके-2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -