घरक्रीडाबृहन्मुंबई महानगरपालिकेने पटकावला मुंबई महापौर चषक

बृहन्मुंबई महानगरपालिकेने पटकावला मुंबई महापौर चषक

Subscribe

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संघाने मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेच्या व्यावसायिक गटाचे जेतेपद पटकावले. त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पश्चिम रेल्वेचा पराभव केला. महिलांमध्ये परांजपे स्पोर्ट्स क्लब आणि श्रीसमर्थ व्यायाम मंदिर यांनी अंतिम फेरी गाठली, तर पुरुषांची अंतिम लढत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी आणि ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर यांच्यामध्ये होईल.

व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात बृहन्मुंबई महानगरपलिकेने पश्चिम रेल्वेचा १०-९ असा १ गुण व ६:३० मि. राखून पराभव करत मानाच्या मुंबई महापौर चषकावर नाव कोरले. या स्पर्धेच्या मध्यांतराला महानगरपालिकेकडे ८-४ अशी आघाडी होती. महानगरपालिकेकडून लक्ष्मण गवस (२:५० मि. संरक्षण आणि २ गडी ), महेश शिंदे (२:३०, १:५० मि. संरक्षण), श्रेयस राऊळ (२:५०, १:१० मि. संरक्षण आणि २ गडी) यांनी दमदार खेळ केला. बँक ऑफ इंडियाने नेव्हल डॉकला नमवून तिसरा क्रमांक पटकावला.

- Advertisement -

महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीसमर्थ व्यायाम मंदिरने शिर्सेकर्स महात्मा गांधी संघाचे कडवे आव्हान १०-७ असे ३ गुणांनी परतवून लावत अंतिम फेरी गाठली. मध्यांतराला बरोबरीत असलेल्या सामन्याच्या दुसर्‍या डावात श्रीसमर्थच्या पहिल्या तुकडीने दमदार संरक्षण करत सामना आपल्या बाजूने झुकवला. समर्थच्या अनुष्का प्रभू (२:१०, ३:१० मि. संरक्षण), साजल पाटील (४:३०, २:५० मि. संरक्षण), भक्ती धांगडे (३ मि. संरक्षण आणि ६ गडी) यांनी चमकदार कामगिरी केली. दुसर्‍या उपांत्य फेरीत परांजपे स्पोर्ट्स क्लबने शिवनेरी सेवा मंडळाचा ७-६ असा पराभव केला. परांजपेच्या आरती कदम (३:५०, २:५० मि. संरक्षण), श्रृती सकपाळ (२:३०, २:५० मि. संरक्षण आणि ३ गडी), रचना जुवळे (२:४०, २:४० मि. संरक्षण आणि १ गडी) या विजयाच्या शिल्पकार होत्या.

पुरुषांच्या उपांत्य फेरीत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने अमरहिंद मंडळावर १४-११ अशी मात केली. महात्माच्या अनिकेत पोटे आणि नितेश रूकेने आक्रमणात प्रत्येकी ४ गडी बाद केले, तर प्रतिक देवरेने पहिल्या डावात २:३० मिनिटे संरक्षण केले. ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने सरस्वती क्लबचा १३-१२ असा पराभव केला. ओम समर्थचे प्रयाग कनगुटकर (१:३०, १:३० मि. संरक्षण आणि ३ गडी), सनी तांबे (१:४०, १:४० मि. संरक्षण आणि १ गडी), अभिषेक काटकर (२:००, १ मि. संरक्षण) चमकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -