घरक्रीडाभारतीय फुटबॉल संघ माझ्यावर अवलंबून नाही!

भारतीय फुटबॉल संघ माझ्यावर अवलंबून नाही!

Subscribe

भारतीय फुटबॉल संघ स्टार खेळाडू सुनील छेत्रीवर अवलंबून आहे, असे मत काही दिवसांपूर्वी भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने व्यक्त केले होते. मात्र, बायचुंगच्या मताशी छेत्री सहमत नाही. भारतीय संघाला यशस्वी होण्यासाठी सुनील छेत्रीने चांगले खेळण्याची गरज नाही, असे छेत्री म्हणाला. भारताकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम छेत्रीच्या नावे आहे. ३५ वर्षीय छेत्रीच्या नावे आतापर्यंत ११२ सामन्यांत ७२ गोल आहेत.

भारतीय संघाला यशस्वी होण्यासाठी सुनील छेत्रीने चांगले खेळण्याची गरज नाही. या संघात २३ प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. संघ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वाचे असते. मी इतर खेळाडूंपेक्षा जरा जास्त नशीबवान आणि अनुभवी आहे इतकेच, असे छेत्री म्हणाला.

- Advertisement -

फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत मंगळवारी भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. याच स्पर्धेत मागील महिन्यात झालेला कतारविरुद्धचा सामना भारताला गोलशून्य बरोबरीत संपवण्यात यश आले होते. या सामन्यात छेत्री आजारी असल्यामुळे खेळू शकला नव्हता. या सामन्यात संघाला तुझी उणीव भासली का, असे विचारले असता छेत्री गमतीत म्हणाला, मी नसल्यामुळेच आमचा संघ कतारविरुद्ध इतका चांगला खेळला. आमचे खेळाडू मला या गोष्टीची रोज आठवण करून देतात.

छेत्री संघासाठी माझ्यापेक्षा महत्त्वाचा -प्रशिक्षक स्टिमॅक

- Advertisement -

सुनील छेत्रीचे पुनरागमन झाल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे, असे भारताचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना वाटते. छेत्रीची कामगिरी किती उत्कृष्ट आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मी तुम्हाला छेत्री किती चांगला माणूस, किती चांगला कर्णधार आहे याबाबत सांगू शकतो. तो भारतीय संघासाठी माझ्यापेक्षा महत्त्वाचा आहे. मात्र, छेत्री महत्त्वाचा की स्टिमॅक, याबाबत फारशी चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही एक कुटुंब आहोत आणि प्रत्येकाला भारतीय संघाच्या यशात योगदान द्यायचे आहे, असे स्टिमॅक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -