विदर्भातील पांढरकवड्यात कबड्डीचा महासंग्राम

Mumbai
कबड्डी स्पर्धा

मराठमोळ्या मातीत रुजलेल्या महाराष्ट्रातील कबड्डी या खेळाला भारतीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अ‍ॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने विदर्भातील पांढरकवडा येथे अखिल भारतीय स्तरावरील पुरुष-महिलांची भव्यदिव्य आमदार चषक कबड्डी स्पर्धा १२ ते १५ फेब्रुवारी १९ या कालावधीत रंगणार आहे. ही स्पर्धा आर्णी, केळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. पुरुष व्यावसायिक प्रौढ व महिलांची ही कबड्डी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, पांढरकवडा येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेच्या पुरुष व्यावसायिक गटात महाराष्ट्रातील एअर इंडिया, महिंद्रा अँड महिद्रा, बीपीसीएल, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र पोलीस, युनियन बँक, सेंट्रल बँक, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे यांच्यासह बीएसएफ, साऊथ सेंटर रेल्वे सिकंदराबाद अशा तगड्या संघांचा समावेश आहे. महिलांमध्ये शिवशक्ती, अमर हिंद, संघर्ष, महात्मा गांधी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, राजमाता, जागृती, एम.एच. स्पोर्ट्स क्लब, शिवम-पुणे आणि पालम स्पोर्ट्स, दिल्ली अशा मात्तबर संघात चुरशीच्या लढती या स्पर्धेत पहायला मिळणार आहेत.

या स्पर्धा रोज सायंकाळी ५ नंतर सुरू होणार असून, साधारण रात्री १० वाजेपर्यंत संपतील. एकाच वेळी चार क्रीडांगणावर या लढती पहावयास मिळणार आहेत. या क्रीडांगणावर प्रशस्त गॅलरी उभारण्यात आलेली असून, साधारण ५० हजार प्रेक्षक या स्पर्धेचा मनमोकळ्यापणाने उपभोग घेणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रकाशझोत व्यवस्थाही करण्यात आली आहे.

स्पर्धेतील व्यावसायिक पुरुष विजेत्या संघाला एक लाख एकावन्न हजार रुपये रोख आणि चषक तर उपविजेत्या संघाला एक लाख आणि चषक मिळणार आहे. तिसर्‍या क्रमांकाच्या संघाला ७१ हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे. तसेच महिला विजेत्या संघास एक लाख, उपविजेत्याला रु. ७५ हजार रोख आणि चषक तर तृतीय क्रमांक मिळवणार्‍या संघाला ४१,००० रुपये दिले जाणार आहेत.

याशिवाय स्पर्धेतील पुरुष-महिला उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक परितोषिके दिली जाणार आहेत, तसेच प्रत्येक दिवासातील पुरुष-महिलांना रु. २५०० इतकी रोख रक्कम देण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी खेळाडू, पंच अधिकारी वर्ग यांची निवास व भजोन व्यवस्था योग्यप्रकारे करत असताना क्रीडांगणावर अग्निशमन दल, प्रथमोपचार कक्ष, अतिथी कक्ष, अल्पोपहार, अ‍ॅम्बुलन्स यांसारख्या आपातकालीन सुविधा देत असल्याचे आमदार प्रो. राजू तोडसाम यांनी सांगितले.