विश्वचषक जिंकणे मुख्य ध्येय !

Mumbai
स्म्रिती मानधना

भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने मागील दीड-दोन वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. तिलाच मागील वर्षीचा आयसीसीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता. ती सध्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्यामुळे माझे छोटे ध्येय पूर्ण झाले आहे, पण विश्वचषक जिंकणे हे माझे मुख्य ध्येय आहे, असे मानधना म्हणाली.

तुम्ही लहानपणी जेव्हा खेळायला सुरुवात करता, तेव्हा एकेदिवशी विश्वचषक जिंकणे हे तुमचे स्वप्न असते. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणे यासारख्या वैयक्तिक गोष्टी नक्कीच खास असतात. मी जेव्हा अव्वल क्रमांक पटकावला होता, तेव्हा मलाही खूप आनंद झाला होता. या क्रमांकावर पोहोचणे एकवेळ सोपे असते. मात्र, ते टिकवून ठेवणे फार कठीण असते. त्यामुळे आता मला अधिक मेहनत करण्याची गरज आहे. क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचल्यामुळे माझे छोटे ध्येय पूर्ण झाले आहे. मात्र, माझे मुख्य ध्येय विश्वचषक जिंकणे हे आहे, असे मानधना म्हणाली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना सोमवारी होणार आहे. हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्याने मानधनाला भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ही मालिका जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे, असे मानधना म्हणाली. पुढील वर्षी होणारा टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन या मालिकेत आम्ही युवा खेळाडूंना संधी देणार आहोत. मात्र, ही मालिका जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे, असे मानधनाने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here