प्रतिस्पर्धी माझ्याविरुद्ध अधिक जिद्दीने खेळणार -सिंधू

Mumbai
p v sindhu
पी. व्ही. सिंधू

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ही स्पर्धा जिंकल्यामुळे प्रतिस्पर्धी मला पराभूत करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक उत्सुक असतील आणि यापुढे यशस्वी होण्यासाठी मला नव्या योजना आखाव्या लागणार, असे विधान सिंधूने केले.

माझ्यावर आता अधिक दबाव असणार आहे. मला यापुढे अधिक मेहनत करावी लागणार आहेत. आता इतर खेळाडूंना मी कशाप्रकारे खेळते, हे माहित झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी बॅडमिंटन कोर्टवर उतरण्याआधी मला काही नव्या योजना आखाव्या आहेत, असे सिंधू म्हणाली.

जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर २१-७, २१-७ अशी मात करत सुवर्णपदक मिळवले. त्याआधी तिला २ रौप्य आणि २ कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे इतकी वर्षे वाट पाहिल्यानंतर सुवर्णपदक जिंकणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते, असे सिंधू म्हणाली. मी गेली पाच वर्षे सुवर्णपदक मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, प्रत्येक वेळी मला पराभवाचा सामना करावा लागत होता. मला खूप दुःख व्हायचे, पण मी प्रत्येक वेळी पुनरागमन करू शकले याचा आनंद आहे. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या यशात प्रशिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. बॅडमिंटनमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्टया सक्षम असणे आवश्यक असते.

चांगल्या प्रशिक्षकांची आवश्यकता!

भारताने चांगले प्रशिक्षक घडवणे आवश्यक आहे, असे काही दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणाले होते. याविषयी सिंधूला विचारले असता ती म्हणाली, सर्वोत्तम खेळाडू घडवण्यासाठी चांगले प्रशिक्षक आवश्यक आहेत. या प्रशिक्षकांना बॅडमिंटनमधील सर्व बारकावे माहित असले पाहिजेत. गोपी सर स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू होते आणि तितकेच उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. आता आम्हाला परदेशी प्रशिक्षकांचीही मदत मिळत आहे. मात्र, आपल्या देशात अधिक चांगल्या प्रशिक्षकांची नक्कीच आवश्यकता आहे.