घरक्रीडादुखापतींची मालिका संपेना!

दुखापतींची मालिका संपेना!

Subscribe

भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषकाची चांगली सुरुवात केली असून ४ पैकी ३ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, दुखापतींनी या संघाचा पिच्छा पुरवला आहे. शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे, तर मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो काही सामन्यांत खेळू शकणार नाही. आता दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत अष्टपैलू विजय शंकरचाही समावेश झाला आहे.

बुधवारी सराव सत्रादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकलेला यॉर्कर विजयच्या पायाच्या बोटाला लागला. त्यामुळे त्याला दुखापत झाली आणि तो गुरुवारी सराव सत्रात भाग घेऊ शकला नाही. मात्र, ही दुखापत फारशी गंभीर नाही असे संघाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

विजयला दुखापत झाली आहे, हे खरे आहे. मात्र, ती फारशी गंभीर नाही. बुधवारी संध्याकाळपर्यंत त्याचे दुखणे कमी झाले होते. त्यामुळे त्याला सामने मुकावे लागणार नाहीत, अशी आम्हाला आशा आहे, असे भारतीय संघाकडून सांगण्यात आले. गुरुवारी विजयने सराव सत्रात भाग घेतला नसला, तरी त्याने धावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने थोडा व्यायाम केला आणि क्षेत्ररक्षणाचाही सराव केला. भारताचा यापुढील सामना शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणार असल्याने विजय या सामन्यात खेळेल अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे.

धवनच्या अनुपस्थितीत आधीच्या सामन्यांत चौथ्या क्रमांकावर खेळलेल्या लोकेश राहुलला सलामीवीर म्हणून खेळावे लागले. त्यामुळे राहुलच्या जागी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी विजय हा प्रमुख दावेदार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १५ चेंडूत १५ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत त्याने इमाम-उल-हक आणि सर्फराज अहमद यांच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्यामुळे विजयच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाच्या अडचणी वाढल्या आहेत. तो पुढील सामन्यापूर्वी फिट होऊ शकला नाही, तर रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यांना संघात संधी मिळू शकेल.

- Advertisement -

भुवनेश्वरची दुखापत गंभीर नाही

मागील रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो किमान २-३ सामन्यांत खेळणार नाही, अशी माहिती भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली होती. मात्र, त्याची दुखापत गंभीर नसल्याने तो ३० जूनला होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी फिट होईल अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे. भुवनेश्वरने गुरुवारी जॉगिंग करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -