घरक्रीडात्रिदेव! 

त्रिदेव! 

Subscribe

'तीन डब्ल्यूज' पैकी एव्हर्टन विक्स या अखेरच्या शिलेदाराचे गुरुवारी निधन झाले. विक्स, वॉलकॉट, वॉरेल हे वेस्ट इंडिज आणि बार्बाडोस क्रिकेटचे त्रिदेव म्हणजे 'दादा बॅट्समन'. त्यांच्या फलंदाजीच्या कथांनी विंडीज क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी क्षणांची नोंद केली आहे. 'तीन डब्ल्यूज' यांना सोनी रामाधीन आणि आल्फ वॅलेंटाईन यांच्या जादुई फिरकीची साथ लाभल्यावर विंडीजने इंग्लंडला इंग्लंडमध्येच ३-१ असे पराभूत करत कसोटी मालिका जिंकली आणि विंडीज क्रिकेटच्या गौरवशाली परंपरेची मुहूर्तमेढ रोवली. 

बार्बाडोस म्हणजे विंडीज क्रिकेटची सोन्याची खाण. अनेक उत्तमोत्तम क्रिकेटपटू त्यांनी विंडीजलाच नव्हे, तर जागतिक क्रिकेटला दिले. विक्स, वॉलकॉट, वॉरेल या ‘तीन डब्ल्यूज’नंतर सर गारफिल्ड सोबर्स, कॉनरॅड हंट, सेमूयेर नर्स प्रभुतींनी ही परंपरा सुरू ठेवली. वॉलकॉट, विक्स यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले ते मायदेशात इंग्लंडविरुद्ध १९४८ च्या मोसमात! विक्स यांना पहिल्या तीन कसोटीत सूर गवसला नाही, पण किंग्सटन जमैकाच्या चौथ्या कसोटीत त्यांनी जवळजवळ चार तास किल्ला लढवत १४१ धावा फटकावल्या आणि विंडीजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. १९४८-४९ च्या भारत दौऱ्यात त्यांनी लागोपाठ ४ शतके झळकावून इतिहास रचला. तर सलग ५ कसोटी सामन्यांमध्ये शतके रचण्याचा विक्स यांचा विक्रम सात दशके झाली तरी अबाधित आहे.

स्वतंत्र भारतातील पहिली कसोटी मालिका झाली ती थेट पाच सामन्यांची! सलामीची कसोटी दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर रंगली. पंतप्रधान पंडित नेहरूंना क्रिकेटमध्ये प्रचंड रस होता. कोटला कसोटीत विंडीजने ३ बाद २७ वरून वॉलकॉट (१५२), गोमेझ (१०१), विक्स (१२८) आणि ख्रिस्तियानी (१०७) यांच्या शतकांमुळे ६३१ धावांची मजल मारली. फॉलोऑन मिळालेल्या भारताने कसोटी अनिर्णित राखली.

- Advertisement -

मुंबईत ब्रेबर्नवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत विक्स यांनी सहा तास खेळपट्टीवर ठाण मांडत १९४ धावा फटकावल्या. कट, ड्राईव्ह हे त्यांचे आवडते फटके! चेंडू उचलून भिरकावण्यापेक्षा जमिनी लगत फटके लगावण्यावर त्यांचा भर असे. पुन्हा फॉलोऑन मिळालेल्या भारताला ही कसोटीही अनिर्णित राखण्यात यश आले. कलकत्ताच्या ईडन गार्डन्स कसोटीत दोन्ही डावात शतके झळकावण्याचा पराक्रम विक्स यांनी केला. पहिल्या डावात २४ चौकारांसह १६२ धावांची आक्रमक खेळी, तर दुसऱ्या डावात केवळ ५ चौकारांसह १०१ धावा त्यांनी केल्या.

मद्रासला झालेल्या चौथ्या कसोटीत ९० धावांवर असताना विक्स धावचीत असल्याचा निर्णय देण्यात आला. तो निर्णय वादग्रस्त होता असे विक्स यांचे साथीदार वॉलकॉट यांचे मत होते. मद्रास कसोटीत विंडीजने डावाने बाजी मारली आणि मालिका १-० अशी जिंकली. या मालिकेत विक्स यांनी ४ शतकांसह ७७९ धावांची बरसात केली.

- Advertisement -

१९५२-५३ मध्ये भारताने विंडीजचा दौरा केला. त्यातही विक्स यांनी ७१६ धावा चोपून काढताना एका द्विशतकासह दोन शतके झळकावली. ही मालिका विंडीजने १-० अशी जिंकली. विक्स यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत १५ शतकांसह ४४५५ धावा केल्या त्या ५८.६२ च्या सरासरीने! विंडीजकडून सर्वोत्तम सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांत जॉर्ज हॅडली यांच्यानंतर विक्स यांचाच क्रमांक लागतो. विक्स उत्तम क्षेत्ररक्षकही होते. ४८ कसोटीत ४९ झेल ही कामगिरी अफलातूनच म्हणायला हवी.

तसेच त्यांनी प्रशिक्षक म्हणून १९७९ वर्ल्डकपमध्ये कॅनडा संघाला मार्गदर्शन केले. रेडिओवर क्रिकेट सामान्यांचे धावते समालोचन याची आवड त्यांनी जोपासली. टोनी कोझीयर, रेक्स परेरा प्रभुतींबरोबर त्यांनी अनेक वर्षे समालोचन केले. १९८९ मध्ये संजय मांजरेकरने बार्बाडोस कसोटीत शतक केल्यावर विक्स यांना संजयचे वडील विजय मांजरेकरांची आठवण आली. विक्स हे विजय मांजरेकरांविरुद्ध खेळले होते. विक्स यांनी सामनाधिकाऱ्याची भूमिकाही बजावली. विक्स ब्रिजदेखील उत्तम खेळायचे. ९५ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना यांना लाभले. वॉरेल, वॉलकॉट यांच्यानंतर विक्स हे देखिल काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांना आदरांजली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -