लिव्हरपूलचा ३० वर्षांचा प्रीमियर लीग जेतेपदाचा दुष्काळ संपला!

सात सामने शिल्लक असतानाच जिंकली स्पर्धा

Mumbai

लिव्हरपूल हा केवळ इंग्लंडच नाही, तर जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. १९९० पर्यंत इंग्लंडमधील स्थानिक फुटबॉलमध्ये लिव्हरपूलचा दबदबा होता. त्यांनी फुटबॉल लीग फर्स्ट डिव्हिजन ही स्पर्धा सर्वाधिक १८ वेळा जिंकली. परंतु, १९९२ मध्ये फर्स्ट डिव्हिजनचे रूपांतर इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये झाले आणि या स्पर्धेत लिव्हरपूलला आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात अपयश आले. लिव्हरपूलला प्रीमियर लीग स्पर्धा एकदाही जिंकता आली नव्हती. परंतु, लिव्हरपूलचा ३० वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपला आहे.

चेल्सीने गुरुवारी रात्री झालेल्या प्रीमियर लीगच्या सामन्यात मँचेस्टर सिटीवर २-१ अशी मात केल्याने लिव्हरपूलचे जेतेपद पक्के झाले. त्यांनी पहिल्यांदाच प्रीमियर लीग जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. इतकेच नाही तर त्यांनी सात सामने शिल्लक असतानाच प्रीमियर लीगच्या चषकावर आपले नाव कोरले. इतके सामने शिल्लक असताना प्रीमियर लीग जिंकणारा लिव्हरपूल हा पहिलाच संघ आहे. त्यांनी यंदाच्या मोसमात आतापर्यंत ३१ पैकी २८ सामने जिंकले असून केवळ एक सामना गमावला आहे. त्यांच्यात आणि दुसर्‍या स्थानावरील मँचेस्टर सिटीमध्ये तब्बल २३ गुणांचा फरक आहे.

लिव्हरपूलने हा जेतेपदाचा दुष्काळ काही महिन्यांपूर्वीच संपवला असता. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा जवळपास तीन महिने बंद राहिल्याने प्रीमियर लीग जिंकण्यासाठी लिव्हरपूलला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागली. परंतु, गुरुवारी रात्री त्यांचे जेतेपद पक्के झाल्यानंतर चाहत्यांनी रस्त्यांवर उतरुन जोरदार जल्लोष केला. यावेळी ते सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फारसा विचार करताना दिसले नाहीत. तसेच बर्‍याच चाहत्यांनी मास्क घालून, गाणी गात लिव्हरपूलचे घरचे मैदान असणार्‍या अ‍ॅनफिल्ड येथे जाऊन एकत्रितपणे आपला आनंद साजरा केला. ’हा विजय चाहत्यांसाठीच आहे’, असे लिव्हरपूलचे प्रशिक्षक युर्गन क्लॉप म्हणाले.

क्लॉप यांची ऐतिहासिक कामगिरी…

लिव्हरपूलचे प्रशिक्षक युर्गन क्लॉप हे इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा जिंकणारे पहिलेच जर्मन प्रशिक्षक आहेत. त्यांची २०१५ मध्ये लिव्हरपूलच्या प्रशिक्षकपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी या संघात अनेक सकारात्मक बदल घडवले. तसेच त्यांनी या संघाचा दर्जा उंचावतील असे खेळाडू खरेदी केले. त्यांच्या मार्गदर्शनात लिव्हरपूलने प्रत्येक मोसमात प्रगती केली आणि अखेर यंदा ३० वर्षांचा प्रीमियर लीग जेतेपदाचा दुष्काळ संपवला. मागील मोसमात क्लॉप यांचा लिव्हरपूल संघ उपविजेता ठरला होता. परंतु, त्यांनी चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here