IPL 2020 : अखेरच्या षटकांत केलेली फटकेबाजी उल्लेखनीय – रोहित शर्मा

मुंबईने दिल्लीचा ५७ धावांनी पराभव करत आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.  

रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५७ धावांनी पराभव करत आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०० धावा केल्या आणि दिल्लीला २० षटकांत केवळ १४३ धावांवर रोखले. त्यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांचे कौतुक केले. तसेच हार्दिक पांड्या (१४ चेंडूत नाबाद ३७) आणि ईशान किशन (३० चेंडूत नाबाद ५५) यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीने रोहितला प्रभावित केले.

मी दुसऱ्याच षटकात बाद झालो. मात्र, त्यानंतर डी कॉक आणि सूर्या (सूर्यकुमार यादव) यांनी ज्याप्रकारे डावाला आकार दिला, ते पाहून खूप आनंद झाला. त्यानंतर आमच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत डावाचा ज्याप्रकारे शेवट केला, ते फारच उल्लेखनीय होते. गोलंदाजांनी पुन्हा एकदा त्यांची कमाल दाखवली. आम्ही काही योजना आखल्या होत्या आणि त्यांनी त्यानुसारच गोलंदाजी केली. आमच्यासाठी हा सर्वोत्तम निकाल ठरला, असे रोहितने नमूद केले.

मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट दुखापतीमुळे दिल्लीविरुद्ध दोनच षटके टाकू शकला. मात्र, त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे रोहितने स्पष्ट केले. बोल्टची दुखापत गंभीर वाटत नाही. अंतिम सामन्याआधी आम्हाला तीन-चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे तो पूर्णपणे फिट होऊन अंतिम सामना खेळेल, असे रोहित म्हणाला.