भारतीय महिलांची विजयी सुरुवात

पहिल्या टी-२० सामन्यात विंडीजचा ८४ धावांनी पराभव

Mumbai

शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने केलेल्या अर्धशतकांमुळे भारतीय महिला संघाने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाचा ८४ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. १५ वर्षीय शफाली आणि मानधनाने १४३ धावांची विक्रमी सलामी दिली. शफालीने या सामन्यात ७३ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी शफाली ही सर्वात युवा भारतीय ठरली आहे. याआधी हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे होता.

या सामन्यात विंडीजची कर्णधार अनिसा मोहम्मदने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिचा हा निर्णय गोलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. भारताची सलामीची जोडी शफाली आणि मानधना यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे पॉवर-प्लेच्या ६ षटकांअखेरीस भारताची बिनबाद ७२ अशी धावसंख्या होती. शफालीने ३०, तर मानधनाने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

अखेर १६ व्या षटकात सेलमनने शफालीला बाद करत ही जोडी फोडली. शफालीने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात मानधनाला ६७ धावांवर कर्णधार मोहम्मदने बाद केले. मानधनाने या धावा ४६ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने केल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (१३ चेंडूत नाबाद २१) आणि वेदा कृष्णमूर्ती (७ चेंडूत १५) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ४ बाद १८५ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना विंडीजला २० षटकांत ९ बाद १०१ धावाच करता आल्या. त्यांची फलंदाज शमेन कॅम्पबेलेने ३३ धावांची खेळी केली. मात्र, तिला इतरांची साथ लाभली नाही. विंडीजकडून कॅम्पबेलेव्यतिरिक्त एकीलाही १५ धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताच्या शिखा पांडे, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक – भारत : २० षटकांत ४ बाद १८५ (शफाली ७३, मानधना ६७; मोहम्मद २/३५, सेलमन २/३६) विजयी वि. वेस्ट इंडिज : २० षटकांत ९ बाद १०१ (कॅम्पबेले ३३; राधा यादव २/१०, पांडे २/२२).