घरक्रीडाआहे पंत बरा जरी...

आहे पंत बरा जरी…

Subscribe

रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन कसोटीत फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या यष्टिरक्षणात मात्र सफाई नव्हती. पंत आणि साहा यांच्यात फलंदाज म्हणून पंतचे पारडे जड असले, तरी यष्टिरक्षणात साहा उजवा आहे. भारतात चेंडू खासकरून चौथ्या आणि पाचव्या दिवशी खूप स्पिन होतो. भारतामध्ये खेळताना यष्टिरक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत यष्टीरक्षक म्हणून पंतला कायम ठेवायचे की साहाला पुन्हा संघात घ्यायचे? हा भारतापुढे मोठा प्रश्न आहे.

ऑस्ट्रेलिया हा जागतिक क्रिकेटमधील दादा संघ. ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे, तेही त्यांच्या मैदानावर हे अशक्यप्राय आव्हान मानले जाते. मात्र, भारतीय संघाने हे शिखर सर केले, केवळ एकदा नाही, तर दोन वेळा. भारतीय संघाला साधारण ७० वर्षे ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. मात्र, त्यानंतर सलग दोनदा भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मागील काही दिवस भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय ठरले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका तीन कसोटी सामन्यानंतर १-१ अशी बरोबरीत होती. या मालिकेचा चौथा सामना गॅबा येथे होणार होता. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया हरवणे आधीच अवघड, त्यातच कसोटी गॅबा येथे होणार असेल तर प्रतिस्पर्धी संघाने सामना जिंकण्याचा विचार न केलेलाच बरा! ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल ३२ वर्षे ब्रिस्बन येथील गॅबाच्या मैदानावर अपराजित होता. मात्र, अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने त्यांची ही मालिका खंडित केली.

- Advertisement -

गॅबा येथे झालेल्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताने ३२८ धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पार केले आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताच्या या विजयात युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने महत्वाची भूमिका बजावली. त्याने चौथ्या डावात नाबाद ८९ धावांची खेळी करत भारताचा विजय सुनिश्चित केला. पंत आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तसेच चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारून बाद होण्याच्या सवयीमुळे त्याच्यावर वारंवार टीकाही होते. गॅबा कसोटीत मात्र पंतचे वेगळे आणि अधिक परिपक्व रूप पाहायला मिळाले.

तो फलंदाजीला आला, तेव्हा भारताला विजयासाठी १६१ धावांची आवश्यकता होती. त्यातच कर्णधार रहाणे नुकताच माघारी परतला होता. त्यामुळे साहजिकच पंतवर दडपण असणार. मात्र, त्याने याचा त्याच्या खेळावर परिणाम होऊ दिला नाही. त्याच्यातील निडरपणा यावेळी त्याच्या कामी आला. त्याने डावाच्या सुरुवातीला थोडी सावध फलंदाजी केली. पहिल्या ३२ चेंडूत त्याने केवळ ११ धावा केल्या, तर त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १०० चेंडू घेतले.

- Advertisement -

अर्धशतक झाल्यावर मात्र पंतने त्याचा नैसर्गिक खेळ करण्यास सुरुवात केली. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव टाकला. त्यामुळे पॅट कमिन्स, नेथन लायन्स यांसारख्या अनुभवी गोलंदाजांनीही चुका करण्यास सुरुवात केली आणि याचा फायदा पंतला झाला. त्याने अर्धशतक झाल्यावर गिअर बदलला आणि पुढील ३८ चेंडूत ३९ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. ‘माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आणि महत्वाचा दिवस आहे,’ असे पंतने त्याच्या खेळीचे आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचे वर्णन केले.

पंतसाठी हा ऑस्ट्रेलिया दौरा तसा चढ-उतारांनी भरलेला होता. पंतची एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. तसेच त्याला पहिल्या कसोटीत संघातून बाहेर ठेवण्यात आले. अ‍ॅडलेड येथे झालेल्या या सामन्यात वृद्धिमान साहाने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली. मात्र, फलंदाजीत त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. पहिल्या डावात केवळ ९ आणि दुसऱ्या डावात तो ४ धावाच करू शकला. त्यामुळे मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत साहाला वगळून पंतला संधी देण्यात आली.

पंतने उर्वरित तीन कसोटीत फलंदाज म्हणून उत्कृष्ट खेळ केला. त्याच्या यष्टिरक्षणात मात्र सफाई नव्हती. त्याने काही झेलही टाकले. ‘पंतने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याच्याइतके झेल इतर एखाद्या यष्टिरक्षकाने सोडले असतील असे मला वाटत नाही,’ अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने पंतवर टीका केली. आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असून पॉन्टिंग या संघाचे प्रशिक्षकपद भूषवतो. असे असतानाही पॉन्टिंगने त्याच्यावर टीका केली, यातच सगळे काही आले.

पंत आणि साहा यांच्यात फलंदाज म्हणून पंतचे पारडे जड असले, तरी यष्टिरक्षणात साहा उजवा आहे. परदेशात चेंडू स्विंग होत असला, तरी यष्टींमागे चेंडू पकडताना फारशी अडचण येत नाही. परंतु, भारतात चेंडू खासकरून चौथ्या आणि पाचव्या दिवशी खूप स्पिन होतो. त्यामुळे भारतात खेळताना यष्टिरक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पंतमध्ये यष्टीरक्षक म्हणून अजून खूप सुधारणा गरजेची आहे.

आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत होणार आहेत. चेन्नईची खेळपट्टीवर फिरकीला अनुकूल मानली जाते. भारताकडे अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव यांच्यासारखे फिरकीपटू असून ते विकेटच्या संधी निर्माण करतील. मात्र, त्यांना यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांची साथ मिळणेही गरजेचे आहे. त्यामुळे यष्टीरक्षक म्हणून पंतला कायम ठेवायचे की साहाला पुन्हा संघात घ्यायचे? हा भारतापुढे मोठा प्रश्न आहे. परंतु, पंतने गॅबावर केलेली अविस्मरणीय खेळी लक्षात घेता त्याला संघाबाहेर बसवणे भारताला अवघड जाऊ शकेल, हे नक्की!

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -