विश्वचषकाचा फारसा विचार नाही !

Mumbai
रिषभ पंत

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये मागील वर्षी पदार्पण केल्यापासून खूप चांगली कामगिरी केली आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये मात्र त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही, पण असे असतानाही मे महिन्यापासून सुरू होणार्‍या विश्वचषकासाठी त्याला भारताने संघात घ्यायला हवे असे काही क्रिकेट समीक्षकांचे मत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचाही समावेश आहे. मात्र, सध्यातरी मी विश्वचषकाबाबत फारसा विचार करत नाही , असे पंतने सांगितले.

मी सध्यातरी विश्वचषकाबाबत फारसा विचार करत नाही आहे, कारण आम्ही भारतात खेळत आहोत आणि इंग्लंडमधील परिस्थिती ही वेगळी असते. मागील आठवड्यात आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळलो आणि आता आयपीएल होणार आहे. त्यामुळे आम्ही सतत सामने खेळत आहोत. मी जेव्हा इंग्लंडमध्ये जाईन, तेव्हाच विश्वचषकाबाबत विचार करेन, असे पंत म्हणाला.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील भारताने अखेरच्या २ सामन्यांत अनुभवी महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देऊन पंतला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला या २ सामन्यांत ५२ धावाच करता आल्या, तर यष्टिरक्षणातही त्याने बर्‍याच चुका केल्या. भारताने ही मालिका गमावल्यामुळे पंतच्या जागी जर धोनी असता तर भारत जिंकला असता असे म्हटले जात आहे, पण लोकांनी माझी आणि महान धोनीची तुलना करणे चुकीचे आहे, असे पंत म्हणाला. मी या तुलनेबाबत फार विचार करत नाही. खेळाडू म्हणून मला धोनीकडून खूप काही शिकायचे आहे.

तो एक महान खेळाडू आहे. लोकांनी माझी आणि त्याची तुलना करू नये, असे माझे मत आहे, पण कोणाला तुलना करायचीच असल्यास मी त्यांना थांबवू शकत नाही. मी मैदानात आणि मैदानाबाहेरही काय केले पाहिजे याबाबत धोनीशी सतत संवाद साधत असतो, असेही पंत म्हणाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here