भारत-ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची कसोटी मालिका व्हावी – शेन वॉर्न

Mumbai
शेन वॉर्न

भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये पुढील मोसमात पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली पाहिजे, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने केली आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार आहे. यात दोन संघांमध्ये चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. चारपैकी एक कसोटी सामना डे-नाईट (विद्युतझोतात) होण्याची शक्यता आहे.

मी याआधीही म्हणालो आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील मोसमात पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली पाहिजे. हे सामने ब्रिस्बन, पर्थ, अ‍ॅडलेड, मेलबर्न (डे-नाईट) आणि सिडनीत झाले, तर मजा येईल. बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मिळून ही मालिका खेळवण्याचा निर्णय घेतील अशी मला आशा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र कार्यक्रमाची कारणे त्यांनी देऊ नयेत, असे वॉर्नने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

ऑस्ट्रेलियन बोर्डाने २०१८-१९ मोसमात भारताला डे-नाईट कसोटी सामना खेळण्याबाबत विचारणा केली होती, पण बीसीसीआयने त्यावेळी नकार दिला. मात्र, आता आम्ही ऑस्ट्रेलियात डे-नाईट कसोटी खेळण्यास तयार आहोत, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here