घरक्रीडारोहित-रहाणेने भारताला सावरले!

रोहित-रहाणेने भारताला सावरले!

Subscribe

तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ३ बाद २२४

भारताच्या रोहित शर्माने कसोटी सलामीवीर म्हणून आपला अप्रतिम फॉर्म कायम राखत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या सामन्याच्या पहिल्या डावात शतकी खेळी केली. हे त्याचे या मालिकेतील तिसरे शतक होते. एका कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतके लागवणारा रोहित हा सुनील गावस्करांनंतर केवळ दुसरा भारतीय सलामीवीर आहे. त्याला अजिंक्य रहाणेची उत्तम साथ लाभली. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताची ३ बाद २२४ अशी धावसंख्या होती. भारताची ३ बाद ३९ अशी अवस्था झाली होती. मात्र, रोहित (नाबाद ११७) आणि रहाणे (नाबाद ८३) या मुंबईकर फलंदाजांनी १८५ धावांची अभेद्य भागीदारी करत भारताचा डाव सावरला. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी ५८ षटकांचाच खेळ होऊ शकला.

रांची येथे होत असलेल्या तिसर्‍या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची खराब सुरुवात झाली. पहिल्या कसोटीत द्विशतक आणि दुसर्‍या कसोटीत शतक झळकावणारा मयांक अगरवाल अवघ्या १० धावांवर माघारी परतला. त्याला कागिसो रबाडाने स्लिपमध्ये उभ्या डीन एल्गरकरवी झेलबाद केले. रबाडानेच भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला खातेही उघडू दिले नाही. कर्णधार कोहलीने काही चांगले फटके मारले, पण १२ धावांवर एन्रिच नॉर्खियाने पायचीत पकडले. आपला दुसरा सामना खेळणार्‍या नॉर्खियाची कसोटी क्रिकेटमधील ही पहिलीच विकेट होती. मात्र, सलामीवीर रोहितने संयमी फलंदाजी करत एक बाजू लावून धरली. त्याला मागील सामन्यात अर्धशतक करणार्‍या रहाणेची उत्तम साथ लाभली. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे लंचपर्यंत भारताची २३ षटकांत ३ बाद ७१ अशी धावसंख्या होती.

- Advertisement -

पहिल्या सत्रात सावधपणे खेळणार्‍या रोहित आणि रहाणेने दुसर्‍या सत्रात धावांची गती वाढवली. रहाणेने रबाडाच्या दोन षटकांत पाच चौकार लगावले. पहिल्या सत्रात ७ षटकांत १५ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद करणार्‍या रबाडाने दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीच्या ४ षटकांत ३० धावा खर्ची केल्या. रोहितने नॉर्खियाच्या चेंडूवर चौकार लगावत ८६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर रहाणेने ७० चेंडूत आपले कारकिर्दीतील २१ वे अर्धशतक झळकावले. यानंतर रोहितने ऑफस्पिनर डीन पीडवर हल्ला चढवला. ८४ धावांवर असताना त्याने पीडच्या सलग तीन षटकांत तीन षटकार लगावत १३० चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सहावे आणि या मालिकेतील तिसरे शतक होते. या दोघांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे दुसर्‍या सत्रात भारताने एकही विकेट गमावली नाही. चहापानापर्यंत भारताची ३ बाद २०५ अशी धावसंख्या होती. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे अखेरच्या सत्रात केवळ ६ षटकेच होऊ शकली. दिवसअखेर रोहित ११७ धावांवर नाबाद होता. त्याने या धावा १६४ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केल्या. रहाणेने १३५ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८३ धावा केल्या.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

भारत : पहिला डाव – ५८ षटकांत ३ बाद २२४ (रोहित शर्मा नाबाद ११७, अजिंक्य रहाणे नाबाद ८३, विराट कोहली १२, मयांक अगरवाल १०; कागिसो रबाडा २/५४, एन्रिच नॉर्खिया १/५०) वि. दक्षिण आफ्रिका.

बवूमा टॉसला आला, स्मिथ संतापला!

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने आशियामध्ये मागील ९ सामन्यांत नाणेफेक गमावली होती. त्यामुळे भारताविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात फॅफसोबत उपकर्णधार टेंबा बवूमा ’प्रॉक्सी’ कर्णधार म्हणून नाणेफेकीला आला. मात्र, त्यालाही नाणेफेक जिंकता आले नाही. परंतु, बवूमाने नाणेफेकीसाठी येणे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथला आवडले नाही. मला ही गोष्ट अजिबातच आवडली नाही. या गोष्टीवरून दक्षिण आफ्रिकन संघाची मानसिकता कळून आली. त्यांनी पहिले दोन सामने नाणेफेक न जिंकल्याने नाही, तर खराब क्रिकेट खेळल्याने गमावले, असे स्मिथ म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -