घरक्रीडालॉर्ड्सवर आज महामुकाबला

लॉर्ड्सवर आज महामुकाबला

Subscribe

क्रिकेटच्या मक्केत लॉर्डसवर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील झुंज मंगळवारी रंगेल. यजमान इंग्लंडपुढे कठीण आव्हान असून बाद फेरीतील प्रवेशासाठी तीनपैकी दोन सामने त्यांना जिंकावे लागतील. ऑस्ट्रेलियानंतर भारत (बर्मिंगहॅम, ३० जून) आणि न्यूझीलंड (चेस्टर-ली-स्ट्रीट, ३ जुलै) अशा तगडया संघांशी इंग्लंडची गाठ पडणार आहे. श्रीलंकेविरुद्ध २० धावांनी झालेला पराभव इंग्लंडला महागात पडण्याची शक्यता वाटते. लसिथ मलिंगा, डी सिल्व्हा यांच्या मार्‍यासमोर इंग्लंडची फलंदाजी कोसळली. अपवाद स्टोक्सचा!

वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसून येते. ११ पैकी ५ स्पर्धेत जेतेपद, दोनदा उपविजेते अशी त्यांची नजरेत भरण्याजोगी कामगिरी असून यंदा बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेतही ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला जेतेपदाने हुलकावणी दिली असून तीनदा त्यांना उपविजेतेपदावरच (१९७९, १९८७, १९९२) समाधान मानावे लागले आहे.

- Advertisement -

गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत साखळीतच गारद होण्याची आपत्ती इंग्लंडवर ओढवली होती. मात्र, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (इसीबी) कर्णधार इऑन मॉर्गनवर विश्वास दाखवत वनडेतील कामगिरी सुधारण्याचा चंगच बांधला. गेल्या ४ वर्षांत त्यांचे डावपेच सफल ठरले. गेल्या वर्षीच ट्रेंट ब्रिजवर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुध्द ६ बाद ४८१ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. हेल्स, बेअरस्टो यांच्या शतकांमुळे, तसेच जेसन रॉय, कर्णधार मॉर्गनच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने विक्रमी धावसंख्या उभारली. यंदा वर्ल्डकपमध्येही इंग्लंडची फलंदाजी बहरली, चारदा त्यांनी त्रिशतकी मजल मारली. परंतु, श्रीलंकेचे २३२ धावांचे माफक आव्हान त्यांंना पेलवले नाही. पाटा खेळपट्ट्यांवर धावांचे इमले उभारणार्‍या इंग्लंडची हेडिंग्लीवर मलिंगा, डी सिल्व्हासमोर दाणादाण उडाली.

बेअरस्टो, रुट, मॉर्गन, बटलर, स्टोक्स अशी फलंदाजांची फळी असणार्‍या इंग्लंडला सलामीवीर जेसन रॉयची उणीव जाणवते आहे. रॉयने बांगलादेशविरुध्द १५३ धावा फटकावल्या. मात्र, दुखापतीमुळे पुढच्या सामन्यांना तो मुकला. त्याच्याऐवजी सलामीला आलेल्या विन्सला मात्र धावा करता आलेल्या नाहीत. मोईन अलीला फलंदाजीत यश लाभलेले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात षटकार लगावण्याच्या नादात विकेट फेकणार्‍या मोईनवर टीका होत आहे. आदिल रशीदच्या फिरकीला यश लाभत असताना मोईनचा ऑफस्पिन चालत नाही हीच इंग्लंडची खरी समस्या! जोफ्रा आर्चर जीव तोडून गोलंदाजी करत असताना दुसर्‍या बाजूने त्याला तोलामोलाची साथ देणारा साथीदार नसावा हे इंग्लंडचे दुदैव! प्लंकेट, वोक्स, स्टोक्स यांना माफक यश मिळाले आहे.

- Advertisement -

सहा सामन्यांतून १० गुण मिळवणारा अ‍ॅरॉन फिंचचा ऑस्ट्रेलियन संघ गुणतक्त्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाची गाठ पडेल न्यूझीलंडशी. लॉर्ड्सवरच हा सामना २९ जूनला रंगेल. ऑस्ट्रेलियाची अखेरची लढत ओल्ड ट्रॅफर्डवर ६ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल. फिंच, उस्मान ख्वाजा, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यासारखे फलंदाज ऑस्ट्रेलियाकडे असून मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स ही तेज जोडगोळी ऑस्ट्रेलियाकडे मौजूद आहे. ऑस्ट्रेलियाने धावांचा, शतकांचा धडाका लावला असून इंग्लंडविरुध्द ते किती धावा करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

यंदा लॉर्डसवर वर्ल्डकपमधील ४ सामने रंगतील. वर्ल्डकपमधील सर्वाधिक अंतिम सामने लॉर्डसवरच झाले असून ४ पैकी २ अंतिम लढतील ऑस्ट्रेलियाचा सहभाग होता. पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमध्ये (१९७५) त्यांना उपविजेतेपद लाभले होते, तर १९९९ मध्ये स्टिव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्डकप पटकावला होता. क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडिजने १९७५, १९७९ मध्ये लागोपाठ दोनदा वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला. १९८३ मध्ये मात्र कपिल देवच्या भारतीय संघाने लॉईडच्या विंडीजला हरवून त्यांचे जेतेपदाच्या हॅटट्रिकचे मनसुबे उधळवून लावले. बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामना लॉर्डसवरच १४ जुलै रंगेल. वर्ल्डकपच्या पाच अंतिम सामन्यांचे यजमानपद लॉर्डसला लाभले आहे हा देखील एक विक्रमच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -