घरIPL 2020आघाडीची फळी टॉप, मधली फळी फ्लॉप!

आघाडीची फळी टॉप, मधली फळी फ्लॉप!

Subscribe

यंदा आयपीएल स्पर्धा युएईत होत आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये खेळपट्ट्या फिरकीला नाही, तर फलंदाजीला अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले आहे. आठही संघांचे आघाडीच्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र अजून म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. 

क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आणि टी-२० हा क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय प्रकार. अगदी १२-१५ वर्षांपूर्वीपर्यंत कसोटी आणि एकदिवसीय हे क्रिकेटचे सर्वोत्तम प्रकार मानले जायचे. क्रिकेट रसिक कसोटी सामने आवर्जून पाहायचे, तेसुद्धा पाचही दिवस. मात्र, हळूहळू टी-२० क्रिकेटला महत्त्व प्राप्त झाले. त्यातच आयपीएल, बिग बॅश लीग यांसाख्या स्पर्धांमुळे टी-२० क्रिकेटची लोकप्रियता शिगेला पोहोचली. मात्र, टी-२० क्रिकेटची हीच लोकप्रियता टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान होते. लोकांनी सामने पाहत राहावेत यासाठी सीमारेषा जवळ आणल्या गेल्या, खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल बनवल्या जाऊ लागल्या. फलंदाजांना फटकेबाजी करणे, षटकार-चौकार मारणे सोपे झाले. त्यामुळे गोलंदाज विकेट घेण्यापेक्षा धावा रोखण्यावर भर देऊ लागले. याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल तर तो म्हणजे आघाडीच्या फळीतील फलंदाजांना. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही हेच पाहायला मिळत आहे.

यंदा आयपीएल स्पर्धा युएईत होऊ असून येथील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असतील आणि फलंदाजांना वेगाने धावा करणे अवघड असेल, असे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी म्हटले जात होते. परंतु, आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये खेळपट्ट्या फिरकीला नाही, तर फलंदाजीला अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले आहे. आठही संघांचे आघाडीच्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र अजून म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. अपवाद मार्कस स्टोइनिस, मॉर्गन, पोलार्डसारख्या काही फलंदाजाचा.

- Advertisement -

यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर आणि कर्णधार लोकेश राहुल अग्रस्थानी आहे. त्याने ६ सामन्यांत ३१३ धावा फटकावल्या असून यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत त्याचा सलामीचा साथीदार मयांक अगरवाल ६ सामन्यांत २८१ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली असली, तरी पंजाबच्या संघाला सहा पैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश. ग्लेन मॅक्सवेल (६ सामन्यांत ४८ धावा), सर्फराज खान (५ सामन्यांत ३३ धावा), करुण नायर (४ सामन्यांत १६ धावा) या पंजाबच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. डावखुऱ्या निकोलस पूरनने (६ सामन्यांत १९६ धावा) काही आक्रमक खेळी केल्या आहेत, पण त्याच्या कामगिरीत सातत्य नाही.

अशीच काहीशी स्थिती आहे ती राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स यांसारख्या संघांची. चेन्नईचा प्रमुख फलंदाज सुरेश रैनाने वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. त्याची उणीव चेन्नईला नक्कीच भासत आहे. फॅफ डू प्लेसिसने तिसऱ्या क्रमांकावर किंवा सलामीला येत सातत्यपूर्ण कामगिरी करताना ६ सामन्यांत २९९ धावा केल्या आहेत. मात्र, त्याला इतरांची फारशी साथ मिळालेली नाही. शेन वॉटसन फॉर्मात येताना (सलग दोन अर्धशतके) दिसत आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (६ सामन्यांत १०२ धावा), केदार जाधव (६ सामन्यांत ५८ धावा), रविंद्र जाडेजा (६ सामन्यांत ९४ धावा) या चेन्नईच्या मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजांनी मात्र निराशा केली आहे. खासकरून धोनी आणि जाधवला फटकेबाजी करता आलेली नाही. धोनीने ६ सामन्यांत केवळ ४ षटकार मारले असून जाधवची षटकाराची पाटी ६ सामन्यांनंतरही कोरी आहे.

- Advertisement -

राजस्थान रॉयल्स संघाने यंदाच्या मोसमाची दमदार सुरुवात करताना सलग दोन सामने जिंकले. त्यानंतर मात्र त्यांची गाडी रुळावरून घसरली. त्यांनी सलग चार सामने गमावले. यापैकी केवळ एका सामन्यात त्यांना १५० हून अधिक धावा करता आल्या. राजस्थानची फलंदाजी ‘टॉप हेवी’ मानली जाते. त्यांच्या फलंदाजीची भिस्त आघाडीच्या फळीवर असते आणि हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यावर संघाला जिंकणे अवघड होते. यंदा सुरुवातीच्या दोन सामन्यांत संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी सलग दोन अर्धशतके झळकावली होती. मात्र, त्यांचा फॉर्म खालावल्यावर राजस्थानचा संघही अपयशी होऊ लागला.

सॅमसनला कामगिरीत सातत्य राखता येत नाही अशी त्याच्यावर वारंवार टीका होते. यंदा त्याने पहिल्या दोन सामन्यांत १५९ धावा केल्या होत्या. या सामन्यांत तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला. मात्र, मधल्या फळी अधिक मजबूत व्हावी यासाठी नंतरच्या काही सामन्यांत त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आले. मात्र, त्याला चार सामन्यांत मिळून केवळ १७ धावा करता आल्या. त्यामुळे राजस्थानची मधली फळी अजूनही कमकुवत वाटत आहे. याऊलट दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या सर्वच फलंदाजांनी प्रत्येक सामन्यात योगदान दिले आहे. त्यामुळे हे दोन संघ गुणतक्त्यात अव्वल दोन स्थानावर आहेत. आता इतर संघांच्या मधल्या फळीतील फलंदाजानी त्यांच्या खेळात सुधारणा न केल्यास त्यांच्या संघांना विजय मिळवणे अवघड होत जाईल, हे नक्की.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -