घरक्रीडारॉड्रिगोची हॅट्ट्रिक; रियाल माद्रिदचा विजय

रॉड्रिगोची हॅट्ट्रिक; रियाल माद्रिदचा विजय

Subscribe

युएफा चॅम्पियन्स लीग

युवा खेळाडू रॉड्रिगोने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर रियाल माद्रिदने युएफा चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात गॅलतासराय संघाचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयामुळे त्यांनी बाद फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. १८ वर्षीय रॉड्रिगोने अवघ्या सात मिनिटांतच आपले पहिले दोन गोल केले. त्यामुळे तो चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात सर्वात जलद दोन गोल करणारा खेळाडू ठरला आहे. तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये रियालसाठी हॅट्ट्रिक करणारा तो दुसरा सर्वात युवा खेळाडू आहे.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच रियालने आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना चौथ्या मिनिटालाच मिळाला. मार्सेलोच्या पासवर रॉड्रिगोने गोल करत रियालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तीन मिनिटांनंतरच पुन्हा मार्सेलोच्या पासवर रॉड्रिगोने आपला आणि संघाचा दुसरा गोल केला. १४ व्या मिनिटाला रियालला पेनल्टी मिळाली. यावर कर्णधार सर्जिओ रॅमोसने गोल करत रियालला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर गॅलतासरायच्या बचावफळीने आपल्या खेळात सुधारणा केली. मात्र, त्यांना रियालला रोखता आले नाही. करीम बेंझमाने केलेल्या गोलमुळे रियालकडे मध्यंतराला ४-० अशी आघाडी होती.

- Advertisement -

मध्यंतरानंतरही रियालने अप्रतिम खेळ केला. परंतु, गॅलतासरायच्या गोलरक्षकाच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांना आपला पाचवा गोल करण्यासाठी काही काळ वाट पहावी लागली. मात्र, ८१ व्या मिनिटाला बेंझमाने आपला दुसरा गोल करत रियालची आघाडी ५-० अशी वाढवली. अखेर सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना रॉड्रिगोने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यामुळे रियालने हा सामना ६-० असा जिंकला. हा रियालचा चार सामन्यांतील दुसरा विजय होता. याच गटातील दुसर्‍या सामन्यात पॅरिस संघाने क्लब ब्रुजवर १-० असा विजय मिळवला. आपले चार पैकी चार साखळी सामने जिंकणार्‍या पॅरिसने बाद फेरीत प्रवेश केला. तसेच ज्युव्हेंटस आणि बायर्न म्युनिक या संघांनीही बाद फेरीत आपले स्थान पक्के केले.

सामन्यांचे निकाल : (रियाल माद्रिद ६-० गॅलतासराय; पॅरिस १-० क्लब ब्रुज; बायर्न म्युनिक २-० ऑलिम्पियाकोस; रेड स्टार ०-४ टॉटनहॅम; अटलांटा १-१ मॅन. सिटी; डीनॅमो झाग्रेब ३-३ शाक्तार; लोकोमोटिव्ह १-२ ज्युव्हेंटस; लेव्हरकुसेन २-१ अ‍ॅट. माद्रिद)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -