युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

Mumbai
आयेक्सने दिला ज्युव्हेंट्सला पराभवाचा धक्का

क्रिस्तिआनो रोनाल्डोच्या ज्युव्हेंट्स संघाला युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत आयेक्स संघाने पराभवाचा धक्का दिला आहे. याआधीच्या फेरीत रोनाल्डोचा पूर्वीचा संघ रियाल माद्रिदचा पराभव करणार्‍या आयेक्सने या फेरीत अप्रतिम पासिंग दाखवत रोनाल्डोच्या सध्याच्या संघालाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. आयेक्सच्या घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लेगनंतर या लढतीत १-१ अशी बरोबरी होती. आयेक्सने दुसर्‍या लेगमध्ये ज्युव्हेंट्सला त्यांच्याच मैदानावर २-१ असे पराभूत करून दोन्ही लेगनंतर ही लढत ३-२ अशी जिंकली. त्यामुळे रोनाल्डोचे सलग चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्नही भंग झाले.

आयेक्सच्या मैदानावर झालेला पहिला लेग १-१ असा बरोबरीत संपल्याने त्यांना दुसर्‍या लेगमध्ये किमान १ गोल करणे अनिवार्य होते. मात्र, या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांना आक्रमक खेळ करता आला नाही. ज्युव्हेंट्सला या सामन्याच्या २८ व्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. मिरेलॅम पॅनिकच्या पासवर रोनाल्डोने हेडर मारत ज्युव्हेंट्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु त्यांना ही आघाडी ६ मिनिटेच टिकवता आली. सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला डॉनी वॅन डी बीक याने गोल करून आयेक्सला १-१ अशी बरोबरी करून दिली. मध्यंतराला ही बरोबरी कायम होती.

मध्यंतरानंतर आयेक्सच्या युवा खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. त्यांच्या आक्रमणाचे ज्युव्हेंट्सच्या बचावफळीकडे फारसे उत्तर नव्हते. या सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला आयेक्सला कॉर्नर मिळाला. यावर ज्युव्हेंट्सच्या दोन खेळाडूंपेक्षा उंच उडी मारून आयेक्सचा कर्णधार मॅथियस डी लिटने हेडर मारत गोल केला आणि आपल्या संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ज्युव्हेंट्सने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण याचा फायदा आयेक्सलाच मिळत होता. त्यांना गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या, पण त्यावर त्यांना गोल करता आला नाही. अखेर त्यांनीच हा सामना २-१ असा जिंकत १९९६/९७ मोसमानंतर पहिल्यांदा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

बार्सिलोनाची मँचेस्टर युनायटेडवर मात

स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या २ गोलमुळे बार्सिलोनाने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये मँचेस्टर युनायटेडचा ३-० असा पराभव केला. त्यांनीच पहिला लेग १-० असा जिंकला. दुसर्‍या लेगमध्ये बार्सिलोनाकडून मेस्सीने १६ आणि २० व्या मिनिटाला २ गोल केले, तर ६१ व्या मिनिटाला अप्रतिम फटका मारत फिलिपे कुटिनियोने तिसरा गोल केला. त्यांचा उपांत्य फेरीत लिव्हरपूल किंवा पोर्टोशी सामना होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here