युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

Mumbai
रोनाल्डोची हॅट्ट्रिक, ज्युव्हेंटसचा विजय

सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इटालियन संघ ज्युव्हेंटसने व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात मानाची स्पर्धा युएफा चॅम्पियन्स लीगमधील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये स्पॅनिश संघ अ‍ॅटलेटीको माद्रिदचा ३-० असा पराभव केला. या विजयामुळे ज्युव्हेंटसने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीतील पहिला लेग अ‍ॅटलेटीको माद्रिदने २-० असा जिंकला होता. त्यामुळे पुढील फेरीत जाण्यासाठी ज्युव्हेंटसला दुसरा लेग ३-० असा जिंकणे अनिवार्य होते.

या सामन्यात ज्युव्हेंटसने सुरुवातीपासून जिद्दीने खेळ केला. दुसर्‍याच मिनिटाला ज्युव्हेंटसचा कर्णधार जॉर्जीयो कियलीनीने गोल केला होता. मात्र, त्याआधी क्रिस्तियानो रोनाल्डोने अ‍ॅटलेटीकोचा गोलरक्षक जॅन ओब्लाकला अयोग्यरित्या पाय मारल्याचे आढळल्याने हा गोल रद्द करण्यात आला. यानंतरही ज्युव्हेंटसने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. याचा फायदा त्यांना २७ व्या मिनिटाला मिळाला. फेडरिको बेर्नार्डेस्कीच्या क्रॉसवर रोनाल्डोने हेडर मारत ज्युव्हेंटसला १-० अशी आघाडी मिळवून दिली. आपल्या भक्कम बचावासाठी ओळखल्या जाणार्‍या अ‍ॅटलेटीकोने आपल्या खेळात सुधारणा केल्यामुळे मध्यांतरापर्यंत ज्युव्हेंटसला एकच गोल करता आला.

मध्यांतरानंतर ज्युव्हेंटसने अधिकच आक्रमक खेळ केला. त्यामुळे सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला त्यांनी २-० अशी आघाडी मिळवली. जाओ कॅन्सलोने उजव्या बाजूने केलेल्या क्रॉसवर पुन्हा हेडर मारत रोनाल्डोनेच हा गोल केला. यानंतर काहीकाळ दोन्ही संघांनी सावध खेळ केला. सामन्याच्या ८२ व्या मिनिटाला ज्युव्हेंटसचा युवा स्ट्रायकर मॉइसे किनला गोल करण्याची संधी मिळाली, मात्र या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे हा सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत असतानाच ८६ व्या मिनिटाला ज्युव्हेंटसला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीचा उपयोग करत रोनाल्डोने आपला आणि ज्युव्हेंटसचा तिसरा गोल केला. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत राखत हा सामना ३-० असा जिंकला. अ‍ॅटलेटीकोला या सामन्यात एकही फटका गोलवर मारता आला नाही. तसेच बाद फेरीत पहिल्या लेगमध्ये २-० अशी आघाडी मिळवल्यानंतर ती लढत गमवणारा अ‍ॅटलेटीको हा चॅम्पियन्स लीगच्या इतिहासातील चौथा संघ आहे.

मॅचेस्टर सिटीने उडवला शाल्काचा धुव्वा

इंग्लिश संघ मँचेस्टर सिटीने युएफा चॅम्पियन्स लीगमधील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये जर्मन संघ शाल्काचा ७-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात सिटीकडून सर्जिओ अगव्हेरो (२), लिरॉय साने, रहीम स्टर्लिंग, बर्नार्डो सिल्वा, फिल फोडेन आणि गॅब्रियल जेसूस यांनी गोल केले. मँचेस्टर सिटीने या लढतीचा पहिला लेग ३-२ असा शाल्काच्या मैदानावर जिंकला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here