घरक्रीडायुएफा चॅम्पियन्स लीग

युएफा चॅम्पियन्स लीग

Subscribe

क्रिस्तिआनो रोनाल्डोने ज्युव्हेंटसला आघाडी मिळवून दिल्यानंतर आयेक्सच्या डेविड नेरेसने केलेल्या अप्रतिम गोलमुळे युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीचा पहिल्या लेग १-१ असा बरोबरीत संपला. तर उपांत्यपूर्व फेरीच्याच दुसर्‍या सामन्यात ल्यूक शॉच्या स्वयं गोलमुळे बार्सिलोनाने मँचेस्टर युनायटेडचा १-० असा पराभव केला. या दोन्ही लढतींचा दुसरा लेग १७ एप्रिलला होणार आहे.

ज्युव्हेंटस आणि आयेक्स यांच्यातील सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. पहिल्या अर्ध्या तासात दोन्ही संघांना गोल करण्याची संधी मिळाली आणि दोन्ही संघांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. स्टार खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डो दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही असे वाटत होते, मात्र तो खेळला आणि त्यानेच ४५ व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत ज्युव्हेंटसला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर आयेक्सने आक्रमक सुरुवात केली. याचा फायदा त्यांना ४६ व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा युवा खेळाडू डेविड नेरेसने उत्कृष्ट वैयक्तिक गोल करत आयेक्सला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतरही आयेक्सने चांगला खेळ सुरु ठेवत ज्युव्हेंटसला आक्रमण करण्याची संधी दिली नाही. मात्र, आयेक्सच्या आघाडीच्या फळीलाही गोल करण्यात अपयश आल्याने हा सामना १-१ असा बरोबरीत संपला. आता आयेक्सला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असल्यास त्यांना ज्युव्हेंटसच्या मैदानावर किमान १ गोल करणे अनिवार्य आहे.

दुसर्‍या सामन्यात बार्सिलोनाने मँचेस्टर युनायटेडला १-० असे पराभूत केले. बार्सिलोनाने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत १२ व्या मिनिटाला आघाडी मिळवली. लुईस सुआरेझने मारलेला हेडर मँचेस्टर युनायटेडच्या ल्यूक शॉच्या अंगाला लागून चेंडू गोलमध्ये गेला. यानंतर दोन्ही संघांच्या बचावफळीने चांगला खेळ केल्याने त्यांना गोल करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे एकच गोल होऊ शकला. मँचेस्टर युनायटेडचा हा यंदाच्या स्पर्धेच्या बाद फेरीतील घरच्या मैदानावरील सलग तिसरा पराभव होता. घरच्या मैदानावरील सलग तीन सामने गमावण्याची युनायटेडची ही पहिलीच वेळ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -