क्रिकेट विश्वाला धक्का; अंडर-१९ वर्ल्ड कप संघातील खेळाडूची आत्महत्या

Under-19 World Cup player commits suicide

कोरोनाच्या काळात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. हे सत्र सिनेसृष्टीपुरते मर्यादित न राहता क्रिकेट विश्वामध्ये देखील सुरु झाले आहे. गेल्या महिन्यात मुंबईत एका खेळाडूने घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. दरम्यान, आता बांगलादेशच्या खेळाडूने आत्महत्या केल्याने क्रिडा विश्व हादरले आहे. मोहम्‍मद सौजिबने आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे. सौजिब सलामी फलंदाज होता, त्याचबरोबर गोलंदाजी करायचा.

२१ वर्षिय मोहम्‍मद सौजिब बांगलादेशच्या अंडर-१९ वर्ल्ड कप संघात होता. मोहम्मद सौजिबने २०१८ मध्ये शिनेपुकुरकडून लिस्ट ए संघाकडून पदार्पण केले होते. या स्पर्धेत त्याला विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला संघात स्थान मिळाले नाही. बांगाबंधु टी-२० कपमध्येही त्याची निवड झाली नव्हती. बांगलादेश क्रिकेट बोर्ड गेम डेवलपमेंट्स मॅनेजर अबु इनाम मोहम्‍मद यांनी सांगितले की, या स्पर्धेत निवड न झाल्यामुळे कदाचित सौजेबने हे धक्कादायक पाऊल उचलले असावे. आशिया कपमध्ये तो श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. मात्र त्याच्या या निर्णयामुळे आम्ही खूप दु:खी आहोत, असे इनाम मोहम्मद यांनी म्हटले.

मोहम्‍मद सौजिबने हे पाऊल तणावामुळे उचलले आहे की, आणखी कोणत्या कारणाने हे अद्याप समोर आले नाही आहे. मात्र गेल्या वर्षापासून मोहम्मद नियमित क्रिकेट खेळत नव्हता. तो केवळ ढाकामध्ये प्रीमिअर लीग खेळला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख खालेद महमूद यांनी सौजिब एक प्रतिभावंत खेळाडू होता असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, मला विश्वास बसत नाही आहे. ही बातमी ऐकून खूप वाईट वाटले असून धक्का बसला आहे.