घरक्रीडापैलवान घडवणारे वसंत पाटीलांचे कुस्ती शिबीर!

पैलवान घडवणारे वसंत पाटीलांचे कुस्ती शिबीर!

Subscribe

मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा येथे उन्हाळी निवासी कुस्ती संस्कार शिबीर सुरू आहे. शिबिराच्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी आणि भारतीय शैली कुस्ती महासंघ उपाध्यक्ष डी. आर. जाधव (अण्णा) गेलो होतो. या शिबिरात मागील ५ वर्षांपासून बर्‍याच कुस्तीगीरांनी भाग घेतला असून वाडा, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि इतर ग्रामीण भागातील पैलवान या ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जात नाही अशा मुंबईत मातीचा आखाडा, बाजूला भव्य मॅटचा आखाडा असू शकतो याचे अनेकांना आश्चर्य वाटते. मात्र, ही किमया केली आहे, शिराळा तालुक्यातील अंत्री या गावातून आलेल्या वसंत पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी.

या शिबिराच्या पहिल्या दिवसापासून दररोज कुस्ती क्षेत्रातील कोणीतरी दिग्गज येऊन या होतकरू मुलांना मार्गदर्शन करत आहेत. पोलीस खात्यातील मोठे ऑफिसर, मोठे डॉक्टर या सर्व खेळाडूंची तपासणी करून गेले. कुस्ती खेळण्यासोबतच स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवायचे याचे मार्गदर्शन करण्यासाठी योगा प्रशिक्षक या शिबिरात येऊन गेले. कुस्तीसोबतच या शिबिरात मुलांना पोहचायचे धडेही देण्यात आले आहेत. या मुलांना सकस आहार मिळावा यासाठी घरगुती पद्धतीचे चांगले तुपातील पोटभर जेवण आणि आठवड्यातून कधीतरी मांसाहारी जेवण आणि भाकरी देण्यात येते. तसेच दूध, थंडाई, अंडी, केळी, फळे हे सर्वही मुलांना देण्यात येते.

- Advertisement -

या शिबिरात सहभागी झालेली बरीच मुले ही गरीब घरातून आली आहेत. कोणाचे पालक रिक्षा चालवतात, कोणाचे पालक माथाडी कामगार आहेत, कोणाचे पालक गॅस एजन्सीमध्ये काम करतात. या सर्वांना कुस्तीसारखा खेळ परवडणारा नाही, पण वसंत पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापारी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांना निमंत्रित करून या मुलांच्या खर्चाला हातभार लावला आहे. ही सर्व मुले इथेच राहतात. त्यांचे पालक शिबिराच्या ठिकाणी राहत नसले तरी येथील प्रशिक्षक आई-वडिलांच्याच मायेने या मुलांची देखभाल करतात आणि त्यांना शिस्तही लावतात. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पालकांनी या आखड्याला जरूर भेट द्या.

कुस्ती क्षेत्रासाठी सुखावणारी गोष्ट

मी आणि वसंत पाटील गप्पा मारत असताना एक छोटी मुलगी तिच्या आईबरोबर आली. आई तिला आखाड्यात सोडून परत जाताच ती मुलगी सर्वांच्या पाया पडली आणि लगेच मॅटवर गेली. कोणी काही न सांगता तिने व्यायाम करण्यास सुरुवात केली. हे पाहून मला जरा आश्चर्य वाटले. मात्र, वसंत पाटील यांनी मला तिच्याविषयी माहिती दिल्यानंतर मला तिचा हेवा वाटला. ती लहान मुलगी गुजराती समाजातील होती. ती मोठ्या व्यापारी घराण्यातील असूनही कुस्ती खेळाकडे वळली होती. तिच्या कुटूंबातील सर्व व्यक्ती उन्हाळ्यात सुट्टीला गावी गेले. आई आणि ती मुलगीसुद्धा गावी जाणार होती, पण तिने आईला सांगितले की, तू गावी जा मी इथे राहून कुस्तीचे धडे घेते. ही गोष्ट ऐकून खूप आनंद झाला. त्या लहान मुलीचे नाव निर अशोक भानुशाली असे आहे. ही मुलगी महाराष्ट्र आणि देशातील कुस्तीत काहीतरी चमत्कार करणार याची मला खात्री आहे.

- Advertisement -

या शिबिराबाबत आणि या आखाड्यात होणार्‍या उपक्रमांबाबत अधिक माहितीसाठी वस्ताद वसंत पाटील (८३२९६०९०३८) यांना संपर्क करा.

– दत्तात्रय जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -