घरक्रीडाशिवम दुबेबाबत खूप उत्सुकता!

शिवम दुबेबाबत खूप उत्सुकता!

Subscribe

मुंबईकर अष्टपैलू शिवम दुबेने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसर्‍या सामन्यात ३० चेंडूत ५४ धावांची खेळी केली. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच अर्धशतक होते. तसेच त्याने याआधी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसर्‍या सामन्यांत तीन गडी बाद करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या केवळ ६ टी-२० सामन्यांच्या कारकिर्दीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये चमक दाखवली आहे. दुबेबाबत भारतीय संघात खूप उत्सुकता असून तो जितके सामने खेळेल, तितका त्याच्यातील आत्मविश्वास वाढेल, असे विधान भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी केले.

दुबेबाबत सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. त्याच्यात खूप प्रतिभा आहे. सामन्यागणिक त्याच्यातील आत्मविश्वास वाढत आहे. विंडीजविरुद्ध मुंबई येथे झालेल्या तिसर्‍या टी-२० सामन्यात त्याने पहिल्या षटकात बर्‍याच धावा खर्ची केल्या होत्या. मात्र, त्याने ज्याप्रकारे पुनरागमन केले, ते वाखाणण्याजोगे होते. पहिले षटक फारसे चांगले न टाकता आल्यानंतरही विराटने दुबेला पुढे गोलंदाजी दिली. यावरूनच त्याला दुबेवर किती विश्वास आहे हे कळते. तो जितके सामने खेळेल, तितका त्याच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि तो चांगला अष्टपैलू बनेल, असे अरुण म्हणाले.

- Advertisement -

तसेच अरुण यांनी वेगवान गोलंदाज दीपक चहरचेही कौतुक केले. दीपकने आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. तो चेंडू स्विंग करण्यात पटाईत आहे. तो स्लो बाउंसर, यॉर्कर यांचाही चांगला वापर करतो. तो परिपूर्ण गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी गोलंदाज होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, त्या त्याच्याच आहेत, असे अरुण यांनी सांगितले.

चायनामान कुलदीप यादव आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहल हे यावर्षीच्या विश्वचषकापर्यंत भारताचे प्रमुख दोन फिरकीपटू होते. मात्र, त्यानंतर ते फारसे सामने एकत्र खेळलेले नाहीत. याविषयी अरुण म्हणाले, संघात समतोल राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. आमच्याकडे अष्टपैलू रविंद्र जाडेजाचा पर्यायही उपलब्ध आहे. सामन्याची परिस्थिती फिरकीपटूंना अनुकूल असल्यास आम्ही चहल आणि कुलदीप यांना एकत्र खेळवू.

- Advertisement -

वॉशिंग्टन लवकरच वनडे संघात स्थान मिळवेल!
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला चेन्नईत होईल. चेन्नईचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर टी-२० संघाचा भाग होता, पण त्याचा एकदिवसीय संघात समावेश नाही. याविषयी भारत अरुण यांनी सांगितले, मला खात्री आहे की, वॉशिंग्टन लवकरच एकदिवसीय संघात स्थान मिळवले. त्याला जेव्हाही संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने संधीचे सोने केले आहे. तो गोलंदाजीत प्रभाव पाडला आहे. मात्र, तो चांगला फलंदाजही आहे. त्यामुळे भविष्यात एकदिवसीय संघासाठी त्याचा नक्कीच विचार होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -