विहारीचे शतक; शेष भारत ३३० धावांत ऑल-आऊट

इराणी करंडक

Mumbai
हनुमा विहारीचे मत

हनुमा विहारी आणि मयांक अगरवाल यांच्या अप्रतिम फलंदाजीनंतर विदर्भाची फिरकी जोडगोळी आदित्य सरवटे, अक्षय वखरेच्या चांगल्या गोलंदाजीमुळे इराणी करंडकाच्या सामन्यात शेष भारताचा पहिला डाव ३३० धावांवर आटोपला. या सामन्यात शेष भारताने चांगली सुरुवात केली. त्यांची १ बाद १७१ अशी धावसंख्या होती, पण यापुढील ९ विकेट त्यांनी १५९ धावांतच गमावल्या.

या सामन्यात शेष भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीवीर मयांक अगरवाल आणि अनमोलप्रीत सिंग यांनी आक्रमक सुरुवात करत पहिल्या ८ षटकांतच ३६ धावा फलकावर लावल्या. रजनीश गुरबानी टाकत असलेल्या नवव्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर अगरवालने तर चौथ्या चेंडूवर अनमोलप्रीतने चौकार लगावला. मात्र पाचव्या चेंडूवर गुरबानीने अनमोलप्रीतला त्रिफळाचित करून ही जोडी फोडली. यानंतर अगरवाल आणि हनुमा विहारीने उत्कृष्ट फलंदाजी केली. अगरवालने आक्रमकपणे फलंदाजी करत ७५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने पुढेही आपली आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली. दुसर्‍या बाजूला संयमाने खेळणार्‍या विहारीने आदित्य सरवटेच्या एकाच षटकात १ षटकार आणि २ चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतरच्या षटकात यश ठाकूरला खराब फटका मारून अगरवाल बाद झाला. त्याने १३४ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकांच्या मदतीने ९५ धावा केल्या. त्याने आणि विहारीने दुसर्‍या विकेटसाठी जवळपास ३० षटकांत १२० धावांची भागीदारी केली.

कर्णधार अजिंक्य रहाणेला फारकाळ खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. रणजीच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवणार्‍या सरवटेने त्याला गलीमध्ये उभ्या संजयकरवी झेलबाद केले, तर मुंबईकर श्रेयस अय्यर १९ धावा करून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसर्‍या बाजूला विहारीने चांगली फलंदाजी सुरु ठेवत १८७ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले, पण ११४ धावांवर त्याला सरवटेने स्लिपमध्ये फझलकरवी झेलबाद केले. यानंतर राहुल चहार (२२) आणि अंकित राजपूत (२५) व्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे शेष भारताचा पहिला डाव ३३० धावांवर आटोपला. विदर्भाकडून आदित्य सरवटे आणि अक्षय वखरेने प्रत्येकी ३ विकेट, तर गुरबानीने २ विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक –

शेष भारत : पहिला डाव – ८९.४ षटकांत सर्वबाद ३३० (हनुमा विहारी ११४, मयांक अगरवाल ९५, अजिंक्य रहाणे १३; अक्षय वखरे ३/६२, आदित्य सरवटे ३/९९, रजनीश गुरबानी २/५८).

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here