IND vs AUS : कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

virat kohli and anushka sharma
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. विराट आणि पत्नी अनुष्का शर्मा या दाम्पत्याला जानेवारी २०२१ मध्ये अपत्यप्राप्ती होणार आहे. त्यामुळे विराट पहिला कसोटी सामना झाल्यावर भारतात परतणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडलेड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतरचे कसोटी सामने हे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (२६-३० डिसेंबर), सिडनी क्रिकेट ग्राऊंड (७-११ जानेवारी २०२१) आणि ब्रिस्बन (१५-१९ जानेवारी २०२१) येथे होणार आहेत.

दुसरीकडे रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा झाली, त्यावेळी रोहितची कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही संघांमध्ये निवड झाली नव्हती. मात्र, रोहितचा आता चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच टी-२० संघात वरुण चक्रवर्तीच्या जागी नटराजनला स्थान मिळाले आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान चक्रवर्तीला दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.