IND vs AUS : क्वारंटाईन असताना विराट कोहली ‘असा’ घालवतोय वेळ!

भारताच्या खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागत आहे.

virat kohli
विराट कोहली

विराट कोहलीचा भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात दाखल झाला. त्यानंतर भारताच्या खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागत आहे. क्वारंटाईनमध्ये असताना भारतीय संघाला सराव करण्याची परवानगी असली तरी त्यांना इतर ठिकाणी फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या हॉटेल रूममध्ये राहून हा वेळ कसा घालवायचा? हा खेळाडूंपुढे मोठा प्रश्न आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली क्वारंटाईनमध्ये असताना ओटीटी प्लॅटफॉर्मवर एखादी मालिका बघण्याला पसंती देत आहे. त्याने याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

‘इस्त्री न केलेला टी-शर्ट, आरामदायी सोफा आणि बघण्यासाठी चांगली मालिका. मी क्वारंटाईनमध्ये असताना असा वेळ घालवत आहे,’ असे कोहलीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून कर्णधार विराट कोहलीबाबत सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कोहली एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील सर्व सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेत मात्र तो केवळ एक सामना खेळणार असून तीन सामन्यांना मुकणार आहे. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या पाल्याला जन्म देणार आहे. त्यामुळे कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. त्यामुळे भारताला त्याची उणीव नक्कीच भासेल असे म्हटले जात आहे.