IPL 2020 : व्हाईड चेंडूसाठी रिव्ह्यूव्ह वापरण्याची परवानगी हवी – कोहली

पंचांचा एक चुकीचा निर्णयही संघाला महागात पडू शकतो, असे कोहलीला वाटते. 

विराट कोहली 

टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव खूप महत्त्वाची असते. त्यामुळे व्हाईड चेंडू आणि कमरेवर फुल-टॉसला देण्यात येणारे नो-बॉल याबाबत पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा वाटल्यास कर्णधारांना रिव्ह्यूव्ह वापरण्याची परवानगी असली पाहिजे, असे आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला वाटते. मी आता केवळ कर्णधार म्हणून बोलणार आहे. पंचांनी व्हाईड चेंडू, तसेच कमरेवरील फुल-टॉसला नो-बॉल ठरवले, पण त्यांचा निर्णय चुकीचा वाटल्यास मला कर्णधार म्हणून रिव्ह्यूव्ह वापरण्याची परवानगी असल्यास आवडेल, असे कोहली एका कार्यक्रमात लोकेश राहुलशी चर्चा करताना म्हणाला.

पंचांकडून चुका होणे स्वाभाविक

आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत किंवा एकूणच टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक निर्णय किती महत्त्वाचा असतो हे आपण पाहिले आहे. पंचांचा एक चुकीचा निर्णयही संघाला महागात पडू शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षणाला काहीतरी घडत असते. त्यामुळे पंचांकडून चुका होणे स्वाभाविक आहे. व्हाईड आणि नो-बॉलसाठी रिव्ह्यूव्ह वापरण्याची परवानगी असल्यास त्यांनाही फायदाच होईल, असेही कोहलीने सांगितले. यंदा आयपीएलमध्ये पंजाबचे कर्णधारपद भूषवणारा राहुल हा कोहलीशी सहमत होता.

…तर सहापेक्षा जास्त धावा द्या

रिव्ह्यूव्हचा हा नियम टी-२० क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही संघाला दोन रिव्ह्यूव्ह वापरण्याची परवानगी द्या. मग ते कसे वापरायचे हे संघांच्या हातात आहे, असे राहुल म्हणाला. तसेच तुला आयपीएलमध्ये कोणता बदल करायला आवडेल असे विचारले असता राहुलने सांगितले, एखाद्या फलंदाजाने १०० मीटरहून लांब षटकार मारल्यास सहापेक्षा जास्त धावा दिल्या गेल्या पाहिजेत.