घरक्रीडावॉश आऊट

वॉश आऊट

Subscribe

पावसाने इंग्लंडमधील बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेचा पिच्छा पुरवला आहे. १६ पैकी ३ सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावे लागले. श्रीलंका-बांगलादेश, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज हे लागोपाठचे दोन सामने, तसेच पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. रोझ बॉल (साउदम्प्टॅन), ब्रिस्टल येथील स्टेडियमवर कव्हर्स टाकल्याचे विदारक द़ृष्य बघायला मिळाले. सामना रद्द झाल्यामुळे संघांना एकेक गुण मिळाला. पहिले तिन्ही सामने गमावणार्‍या द.आफ्रिकेने आपले गुणांचे खाते खोलले त्यामुळे कर्णधार फॅफ डू प्लेसिसची कळी खुलली. ‘‘सुटलो एकदाचे, भोपळा तर फुटला’’ अशी त्याची अवस्था झाली असावी. विंडीजविरुध्दच्या सामन्यात ७ षटकांत २ बाद २८ अशी त्यांची बिकट अवस्था झाली होती, परंतु पावसामुळे त्यांच्या पदरात एक गुण पडला.

श्रीलंकेला तर रद्द सामन्यांमुळे दोन गुणांचा (१+१) लाभ झाला. पाकिस्तान तसेच बांगलादेश या आशियाई शेजारी देशांविरुध्दचे त्यांचे सामने पावसामुळे वाया गेले, त्यामुळे सामने न खेळताच दोन गुण त्यांच्या पदरात पडले. न्यूझीलंडने श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा उडवून त्यांच्यावर १० विकेट्स राखून विजय मिळविला होता.

- Advertisement -

बांगलादेशचे इंग्लिश प्रशिक्षक स्टीव र्‍होड्स यांनी आयसीसीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. वूस्टरशायरकडून कौंटी स्पर्धेत खेळण्याचा मोठा अनुभव र्‍होड्स यांना असून वर्ल्डकपमधील साखळी सामन्यांसाठी राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी आयसीसीला केला आहे. बहुतांशी संघांना दोन सामन्यांदरम्यान मुबलक वेळ असून सामन्यासाठी राखीव दिवस ठेवणे श्रेयस्कर ठरले असते, अशी त्यांची धारणा आहे. माणूस चंद्रावर जाऊन पोचला तर राखीव दिवस द्यायला काय अडचण होती, अशी खोचक टीकाही र्‍होड्स यांनी केली. इंग्लंडमधील लहरी हवामान लक्षात घेता अजून खूप पाऊस बाकी आहे असेही सूचक उद्गार त्यांनी काढले.

श्रीलंकेसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध दोनऐवजी एकच गुण मिळाल्यामुळे र्‍होड्स वैतागले. श्रीलंकेविरुध्द दोन गुण मिळविण्याची खात्री होती, एक गुण आम्ही हकनाक गमावला, ही बाब निराशाजनक आहे. उरलेले सारे सामने जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करु. हवामानापुढे कोणाचा इलाज? श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नने राखीव दिवसाबाबत अनुकुलता दर्शवली, परंतु गुण पदरात पडल्यामुळे स्वारी खुशीत होती.

- Advertisement -

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये केवळ उपांत्य आणि अंतिम लढतीसाठी राखीव दिवसांची तरतूद करण्यात आली आहे. १० संघांचा सहभाग असलेल्या साखळी स्पर्धेच्या वेळापत्रकाची आखणी करताना खेळपट्टीची निगराणी, संघांच्या प्रवासाचे वेळापत्रक, स्पर्धेच्या ठिकाणांची (व्हेन्यूज) उपलब्धता, स्पर्धेसाठी लागणारा कर्मचारी वर्ग, सामनाधिकारी यांची उपलब्धता, प्रक्षेपण करणार्‍या यंत्रणांची सोय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेक्षकांना कराव्या लागणार्‍या प्रवासाची दगदग या सर्व बाबींचा विचार करुन आयसीसीने वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केले, असा खुलासा आयसीसीचे माजी सीईओ डेव रिचर्डसन यांनी केला असून, र्‍होड्स यांचे समाधान होणे कठीणच दिसते.

एका सामन्याच्या प्रक्षेपणासाठी किमान १२०० कर्मचारी पडद्यामागे राबत असतात. सामानाची ने-आण करण्याचे जिकीरीचे काम दोन सामन्यादरम्यान केले जाते. राखीव दिवसांसाठी वेळ आहेच कुठे? आणि इतके करुनही राखीव दिवशी पाऊस नसेलच याची काय हमी? असा सवालही रिचर्डसन करतात आणि तो रास्तच म्हणावा लागेल.

यंदा ब्रिटनमध्ये जूनचे हवामान थोडेसे अजबच आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असून काही भागात तर पावसाने कहर केला आहे. आतापर्यंतच्या १२ वर्ल्डकप स्पर्धांपैकी १९९२ (ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड), तसेच द.आफ्रिकेत झालेल्या २००३ मधील स्पर्धेत प्रत्येकी २-२ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. यंदा तर पहिल्या पंधरवडयातच तीन सामने पावसात वाहून गेले आहेत. भारत-न्यूझीलंड या ट्रेंट ब्रिजवरील लढतीवरही पावसाचे सावट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -